जळगाव : विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांवर आपली खदखद बोलून दाखवली आहे.
भाजपने विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत नवीन उमेदवारांना संधी दिली.पण, यामुळे भाजपमध्ये वाद पेटला आहे. एकनाथ खडसे यांनी आज जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
‘विधान परिषद निवडणुकीसाठी माझ्यासह, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस केली होती. तसंच आमची शिफारस केल्याचंही राज्यातील भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. पण, आम्हाला डावलून भारतीय जनता पक्षाकडून 4 नव्या उमेदवारांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केले.
ज्या लोकांनी फॉर्म भरला ते सकाळी हजर होते इतक्या कमी वेळात ते कसे हजर झाले? त्यांचे कागदपत्र पाहिले तर मार्च महिन्यात मध्येच त्यांची कागदपत्र जमवलेली होती. त्यांना यापूर्वीच तुमचे तिकीटं फायनल आहे असं सांगण्यात आलं होतं. जर असं होतं तर आमची शिफारस केली, असं सांगण्याची गरजच नव्हती. भाजपच्या संसदीय बोर्डाकडे फक्त आमच्या नावाची शिफारस केली होती, या चार उमेदवारांची नाव पाठवली नव्हती’, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.
तसंच, कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी पाटील यांनी त्यांना विधान परिषदेचं तिकीट देणार असं आश्वासन दिलं होतं. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
तसंच, ‘मला उमेदवारी दिली नाही. याबद्दल माझा कुठल्याही थेट नेत्यावर आरोप नाही. जे काही सांगायचं असेल ते पक्षाच्या वरिष्ठांकडे सांगणार आहे’, असंही खडसे म्हणाले.
काँग्रेसकडून होती ऑफर – खडसे
दरम्यान, ‘विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी मला काँग्रेसकडून ऑफर होती. मी काँग्रेसची उमेदवारी घेतली असती तर भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी मला क्रॉस वोट केलं असतं. या आमदारांनी तसं माझ्याकडे मान्यही केलं होतं,’ असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला होता.