शासकीय गोदामातील धान्य चोरीची माहिती स्थानिक प्रशासनाला दिल्याचा संशयावरून वृत्तवाहिनीचे परळीतील पत्रकार संभाजी मुंडे यांच्या घरावर सोमवार रात्री दहा ते पंधरा लोकांनी धारदार शस्त्रासह प्राणघातक हल्ला केला. यात पत्रकार संभाजी मुंडे, मुलगा विष्णू, पत्नी पार्वती यांना जबर मारहाण करण्यात आली असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
बीड जिल्ह्यातील परळी शहरातील अमर मैदान भागातील वृत्तवाहिनीचे स्थानिक पत्रकार संभाजी मुंडे यांच्या घरावर सोमवारी रात्री पंधरा ते वीस लोकांनी धारदार शस्त्रांनी आणि दगडाने घरावर हल्ला केला. शिवीगाळ करीत टोळक्याने संभाजी मुंडे, मुलगा विष्णू आणि पत्नी पार्वती यांना मारहाण केली. संभाजी यांच्या अंगावर अनेक ठिकाणी चाकूने वार केले तर दगडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली व जखमी तीघानांही दवाखान्यात दाखल केले.
हल्ला शासकीय गोदामातून धान्य चोरीची माहिती तहसील प्रशासनाला दिली याचा राग मनात धरून करण्यात आल्याचा जबाब संभाजी यांनी पोलीसांना दिला आहे. मुंडे यांच्या घराशेजारीच शासकीय धान्याचे गोदाम आहे. काही दिवसांपासून या गोदामातून धान्य चोरीला जात असल्याची बाब निदर्शनास आली होती. याबाबतची माहिती संभाजी यांनी तहसील प्रशासनाला दिली. मात्र, प्रशासनातूनच ही बाब संबंधित चोरांना कळाली व त्यांनी संभाजी यांच्यावर प्रणघातक हल्ला चढवला. याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमानुसार परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश
पत्रकार संभाजी मुंडे हल्ला प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीसांना दिले आहेत. शहरात कोणत्याही प्रकारची आणि कोणाचीही गुंडगिरी चालू केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत पोलीसांना आरोपी मिळाले नव्हते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासह अनेक संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

अधिक वाचा  हरियाणाच्या निकालामुळे महाराष्ट्रात काँग्रेस काय-काय गमावणार?