लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे चार कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा असं वारंवार सांगितलं जात असतानाही अनेकांनी ते पाळले नाहीत. त्यामुळे आत्तापर्यंत १९ हजार ८३८ जणांना अटक झाली आहे. तसेच ५६ हजार ४७३ वाहनं जप्त करण्यात आली आहेत असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाउनच्या काळात अवैध वाहतुकीची १ हजार २९१ प्रकरणं समोर आली आहेत. तर पोलिसांवर हल्ले झाल्याच्या २१२ घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत ७५० जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ७९२ जण क्वारंटाइन आहेत. त्यापैकी ६६२ जणांनी क्वारंटाइनच्या नियमांचा भंग केला आहे अशीही माहिती देशमुख यांनी दिली आहे. तसंच राज्य सरकारने ४ हजार १९ मदत केंद्र करोना रुग्णांसाठी उभी केली आहेत. या केंद्रांमध्ये ३ लाख ८८ हजार ९४४ स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  सोयाबीनवर हजारोंचा खर्च