मुंबई: ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्थेमुळं घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी राज्यकर्त्यांनी ‘करोना’चे भजन थांबवावे. करोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील,’ असा सल्ला शिवसेनेनं केंद्र आणि राज्यातील सरकारांना दिला आहे.
करोनाच्या साथीमुळं सुरू झालेला लॉकडाऊन दर १४ दिवसांनी वाढत आहे. त्याचबरोबर घरात बसून असलेल्यांची अस्वस्थता वाढत आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यमवर्गीय देखील रेशनच्या रांगेत उभे राहू लागले आहेत. या विदारक परिस्थितीवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.
‘लॉकडाऊन काढला किंवा वाढवला तरी दोन्ही बाजूला मरण हे जनतेचेच आहे. त्यामुळं आता निर्णय घ्यायला हवा. जनतेचा धीर सुटणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा लोकांच्या संतापाला तोंड देणं कठीण होईल,’ असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
‘लोकांना आजच जगायचे आहे. त्यांना उद्याचा हवाला नको. अगदी रुग्णालयात बाजूला मृतदेह ठेवून उपचार होत असतील तरी त्यांना जगायचे आहे. आज जे काही आर्थिक संकट ओढवले आहे ते करोनामुळं असले तरी कोणत्याही सरकारला हातावर हात धरून बसता येणार नाही. सरकारनं आता लोक कामाधंद्याला कसे लागतील हे पाहायला हवे. त्यासाठी सरकारने करोनाच्या तिरडीवरून उठायला हवे. मात्र, लॉकडाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तरही जनतेला मिळायला हवे,’ अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  ३७० हटवल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीतही भाजपचा पराभव! ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री