मुंबई: राज्यातील ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागांमध्ये अर्थचक्र पुन्हा एकदा सुरू झालं आहे. या भागांत आतापर्यंत ५७ हजार ७४५ उद्योगांना कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून प्रत्यक्षात २४ हजार ४८६ कारखाने सुरू झाले आहेत व या कारखान्यांत ६ लाख ५० हजार कामगार काम करत आहेत, अशी महत्त्वाची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली. विशेष कृती दल परदेशी कंपन्यांशी वाटाघाटी करत असून करोना संसर्गानंतरच्या उद्योगविश्वात महाराष्ट्राला महासंधी आहे, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर यांच्या वतीने आयोजित वेबीनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना करोना संकटात उद्योगंधदे सुरू राहण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्या अडचणी आहेत, यावर महत्त्वाचा तपशील दिला. उद्योगांबाबत सरकारची भूमिका काय आहे, हेसुद्धा देसाई यांनी स्पष्ट केले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह विविध उद्योग क्षेत्रातील पाचशेपेक्षा जास्त प्रतिनिधींनी या ऑनलाइन चर्चासत्रात भाग घेतला.
देश आणि राज्याचे अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला चांगलं यशही येत आहे. करोनामुळे जी क्षेत्रे प्रतिबंधित झाली आहेत तिथे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचणी येत आहेत. अर्थात आपली पहिली लढाई करोनाशी असल्याने ते लक्षात घेऊनच पुढची पावले टाकली जात आहेत, असे देसाई यांनी नमूद केले. उद्योगांना वीजबिलाबाबत दिलासा देण्यात आला आहे. त्याबाबत देसाई यांनी माहिती दिली. उद्योजकांकडून फिक्स डिमांड चार्जेस ऐवजी जितका वीजवापर होईल तेवढ्याच युनिटचे बिल आकारण्यास महावितरणने सुरुवात केली आहे, असे देसाई यांनी सांगितले. चीनमधून अनेक कंपन्या आपले उत्पादन केंद्र हटविण्याच्या विचारात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात विदेशी गुंतवणूक यावी, यासाठी विशेष कृती दल वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. लवकरच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल परदेशी कंपन्यांबरोबर चर्चा वाटाघाटी करत आहे, असे नमूद करताना करोना संसर्गानंतरच्या उद्योगविश्वात महाराष्ट्राला महासंधी आहे, असे देसाई म्हणाले.
कारखाने सुरू होण्याची व कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. ही एक सकारात्मक बाब असून आता खचून न जाता सर्वांनी येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार व्हावे. संकटाबरोबर संधी देखील येत असतात, हे कायम ध्यानात ठेवावे, असे आवाहन देसाई यांनी केले. उद्योग विभागाचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी या चर्चासत्रात भाग घेतला.

अधिक वाचा  भाजपा ‘बालेकिल्ला’ कोथरूडची विधानसभेत ‘हॅट्रिक’च बिकट?; तिहेरी बलस्थानातच बंडखोरीचा ‘एल्गार’