मुंबई : विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालं आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत आहे. आज महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून अर्ज दाखल केले जाणार आहे. तर भाजपकडून आणखी दोन उमेदवार अर्ज दाखल करणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून याआधी चार उमेदवारांनी अर्ज भरले आहे. तर आज भाजपकडून आणखी दोन उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. भाजपचे नेते संदीप लेले आणि रमेश कराड हे विधान भवनात दाखल झाले आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्जात कोणती चूक झाली अथवा काही अडचणीमुळे अर्ज बाद झाला तर त्यासाठी खबरदारी म्हणून हे दोन डमी उमेदवार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीचा तिढा सुटला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे.
पण त्या पूर्वीच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीचे 5 आणि भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करेल. या निवडणुकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सद्स्य बनणार असल्यामुळे, महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता आता स्थिर राहणार आहे.
महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी जाहीर?
तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या नावाची घोषणा खुद्द दिल्लीतून करण्यात आली आहे.
भाजपकडून कोण उमेदवार?
भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.