पिंपरी-चिंचवड : शहरात अडकून पडलेल्या उत्तराखंड येथील मजुरांना पोलिसांनी खाण्या-पिण्याच्या वस्तू देऊन विशेष बसने रेल्वे स्टेशनपर्यंत रवाना केले. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या उत्तराखंड येथील परप्रांतीय कामगारांना शहरातून पीएमपी बसने पुणे स्टेशनला पाठविण्यात आले, तिथून पुढे त्यांच्या मूळ गावी ते रेल्वेने जाणार आहेत. १०० परप्रांतीयांना येथून रवाना करण्यात आलं असून त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी देखील आहेत. यावेळी या प्रत्येक नागरिकांला बिस्कीट आणि पाण्याची बाटली वाकड पोलिसांमार्फत देण्यात आली. यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. तर रात्री उशिरा ६२ परप्रांतीय मजुरांना खासगी बसने त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं.
वाकड परिसरातील १०० परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी उत्तराखंड येथे आज पाठविले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी फिजिकल डिस्टंसिंगच पालन करीत प्रत्येक कामगाराला पाण्याची बाटली आणि बिस्कीट पॅकेट देत सकाळी चार पीएमपी बसमध्ये बसवून देण्यात आले.
पुणे स्टेशन येथून हे सर्व कामगार रेल्वेने आपल्या मूळ गावी जाणार आहेत. तर, रात्री उशिरा ६२ उत्तरप्रदेश येथील परप्रांतीय कामगारांना खासगी बसने त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना करण्यात आलं तेव्हा बसमधील परप्रांतीय कामगारांनी ‘महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’ अशा घोषणा देत पोलिसांचे आभार मानले. वाकड पोलिसांना त्यांना पास मिळवून देण्यासाठी मदत केली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने उपस्थित होते.