मुंबई : मुंबईत रविवारी दिवसभरात ८७५ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सरकारी यंत्रणांची झोप उडाली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १३ हजार ५६४ वर पोहोचली आहे. रविवारी १९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५०८ झाली आहे.
करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ६२५ संशयित रुग्णांना रविवारी निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णालयात दाखल केलेल्या संशयितांची संख्या १५ हजार २६ झाली आहे. रविवारी दिवसभरात १९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात १० पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी १३ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. रविवारी २१२ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत बरे होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या तीन हजार चार झाली आहे.
धारावी, दादर, माहीमधील रुग्ण एक हजारावर
मुंबई महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालय क्षेत्रातील धारावी, दादर आणि माहीम परिसरातील एकूण १,०८७ नागरिकांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत या तिन्ही ठिकाणच्या ४२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी २६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनाने धारावीत धुमाकूळ घातला आहे. धारावीत रविवारी आणखी २६ जणांना करोनाची बाधा झाली असून दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८५९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे २९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. धारावीमधील २२२ करोनाबाधित बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.माहीममध्ये सात, तर दादरमध्ये दोघांना करोनाची बाधा झाल्याचे रविवारी उघडकीस आले. त्यामुळे माहीम आणि दादर येथील करोनाबाधितांची संख्या अनुक्रमे ११९ आणि १०९ वर पोहोचली आहे. माहीममध्ये करोनामुळे दोघांचा रविवारी मृत्यू झाला असून करोनाबळींची संख्या सात झाली आहे. दादरमध्ये आतापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. माहीममधील २८, तर दादरमधील १७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
नव्या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णपाहणी
बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, पोदार रुग्णालय आणि एनएससीआय वरळी येथील करोनाबाधित रुग्णांच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी ‘दवफए’र ०फ’ (‘क्ष-किरण सॉफ्टवेअर’) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत या नव्या तंत्रज्ञानाद्वारे तीन हजार एक्स-रे तपासण्यात आले. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली की नाही याची या तंत्रज्ञानाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर पाहणी करण्यात येत आहे. अन्य रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीची पाहणी या तंत्रज्ञानाद्वारे करण्याचेही प्रस्तावित आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांचा ४७ वा स्मृतिदिन संपन्न