चीनचा शेजारी देश असलेल्या तैवानमध्ये मागील २९ दिवसांपासून करोनाचा एकही स्थानिक रुग्ण अढळून आलेला नाही. तैवानमधील सेंट्रल एपिडमीक कमांड सेंटरने (सीईसीसी) सोमवारी (११ मे रोजी) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. नवीन रुग्ण अढळून आला नसला तरी एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असून देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात वर पोहचली असल्याचे वृत्त, तैवान न्यूज या वेबसाईटने दिले आहे.
तैवानचे आरोग्यमंत्री आमि सीईसीसीचे अध्यक्ष असणाऱ्या चेन शीर-चुंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत देशातील करोनासंदर्भातील आकडेवारीची माहिती दिली. मृत्यू झालेली व्यक्ती ही अमेरिकेहून परतली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये करोनाची लक्षण दिसून लागली होती. त्याची करोना चाचणी सकारात्कम आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र दुर्देवाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती चेन यांनी दिली.
तैवानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ६७ हजार ४०० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार २९८ चाचण्यांचा निकाल नकारात्मक आला आहे. देशामध्ये करोनाचे ४४० रुग्ण असून त्यापैकी ३४९ हे परदेशातून देशात झालेले रुग्ण आहेत. ५६ जण स्थानिक म्हणजेच देशातील रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे नौदलाच्या गुडवील फिटच्या माध्यमातून देशात दाखल झालेले आहेत. तैवानमध्ये करोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.
तैवानने असं काय केलं?
तैवान हा चीनच्या कुशीतला देश. आपल्या कुशीतल्या प्रत्येकाचं मातृत्व आपल्याकडेच आहे, असा चीन मानतो. त्यामुळे तैवानवरही तिबेट आणि हाँगकाँगप्रमाणे चीनचा डोळा आहे. ताजी समस्या निर्माण झाली आहे ती यातूनच. खरं तर या मुठीएवढय़ा देशानं करोनाचा धोका सर्वात आधी ओळखला. पलीकडच्या चीनमधे घडतंय ते काही तरी भयानक आहे याची जाणीव होऊन या देशानं जागतिक आरोग्य संघटनेसमोर धोक्याचं निशाण फडकावलं. तर ३१ डिसेंबरला म्हणजे जगभरातील अनेक देशामध्ये करोना हे प्रकरण साधं चर्चेतही नव्हतं त्यावेळी तैवाननं त्याचा धोका ओळखून पावलं टाकायला सुरुवातही केली होती. करोनाला सार्वजनिक आरोग्य आपत्ती असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने ३० जानेवारी रोजी केली. म्हणजे ही घोषणा होण्याच्या एक महिनाआधीपासूनच तैवानने करोनासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती.
एकीकडे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेऊन उपाययोजना केल्या जात असतानाच दुसरीकडे देशातील लोकांच्या तपासण्या करण्यास तैवानने सुरुवात केली. आतापर्यंत तैवानने ६७ हजार ४०० करोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ६६ हजार २९८ चाचण्यांचा निकाल नकारात्कम आला आहे. इतकचं नाही देशामध्ये करोनाचे रुग्णांची संख्या जास्त नसतानाही तैवानने काहीकाळ लॉकडाउनचा निर्णय घेत लॉकडाउनचे निर्बंध कठोरपणे अंमलात आणले. आजही तैवानमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा इतका कमी असताना काही नियमांमध्ये अजिबात सूट देण्यात आलेली नाही. आजही तैवानमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या परदेशी तसेच स्थानिक लोकांना १४ दिवस सक्तीने क्वारंटाइनमध्ये ठेवले जात आहे.
आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या त्यामधून देशात येणारे प्रवासी यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जातं आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब, मास्क बंधनकारक करणे अशा निर्णयाच्या माध्यमातून आणि ताची कठोरपणे अंमलबजावणी करत तैवानने करोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवलं आहे. तैवानच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक केलं जात आहे.