जर तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची चिंता सतावत असेल तरी काळजी करू नका. तुम्हाला ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेता लाभ घेता येईल. जर तुमची कंपनी तुमच्या वेतनातून पीएफ किंवा ईएसची रक्कम कापत असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला २४ महिन्यांकरिता सरकारकडून पैसे मिळत राहणार आहेत. ‘कर्मचारी राज्य विमा महामंडळा’च्या (ईएसआयसी) ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी आधी नोंदणी करणं आवश्यक आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यास सरकार त्याला दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. ही मदत दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे. बेरोजगार व्यक्तीच्या गेल्या ९० दिवसांच्या सरकारचीच्या २५ टक्के इतकी रक्कम त्याला मदत म्हणून देण्यात येणार आहे. जे लोक ईएसआयसीशी जोडले गेले आणि ज्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरी केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याव्यरिक्त आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटही डेटाबेसशी जोडलेला असणं आवश्यक आहे.
कशी कराल नोंदणी?
‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता.
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकचा वापर करा.
हा फॉर्म भरल्यानंतर तो नजीकच्या ईएसआयसी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. तसंच यासोबत २० रूपयाचा नॉन ज्युडिशिअल स्टँप पेपरवर नोटरीद्वारे अॅफिडेव्हिट द्यावं लागणार आहे. यामध्ये AB-1 पासून AB-4 पर्यंत फॉर्म जमा करून घेतला जाईल. सध्या यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येऊ शकतो.
… यांना फायदा नाही
जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या कामामुळे कंपनीतून काढून टाकलं असेल, तसंच एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसंच जर तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेतली असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.