मुंबई: करोना संकटकाळात मुंबई आणि परिसरातील मिठाची मागणी चारपट वाढली आहे. मुंबईत दररोज जवळपास अडीच लाख किलो मिठाची मागणी असते. त्याऐवजी आता १० लाख किलो मीठ विक्री होत आहे. असे असले तरी पुरवठा सुरळीत असून मिठाचा २० टक्के साठा अतिरिक्त आहे, असा दावा उत्पादक असोसिएशनने केला आहे.
करोना संकटकाळात लॉकडाउन सुरू असताना मागील काही दिवसांत मुंबईतील मिठाची मागणी वाढली आहे. करोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मिठाचा वापर वाढला असल्याचे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) मुंबई प्रदेश अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘मागील काही दिवसांत व्यापाऱ्यांकडून मिठाची मागणी चारपट वाढल्याचे दिसून येत आहे. याचे कारण ग्राहकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बाहेरून घरी येणारी प्रत्येक वस्तू मिठाच्या गरम पाण्यातून काढण्याची पद्धत अनेकांनी अवलंबली आहे. त्यामुळेच मागणी वाढली आहे. परंतु सध्या मुंबईत जवळपास १५ ब्रॅण्डेड व १५ लहान कंपन्यांचे मीठ बाजारात उपलब्ध आहे. वितरकांकडून पुरवठा सुरळीत आहे. यामुळे तुटवडा भासण्याची स्थिती नाही.’
भारतीय मीठ उत्पादक असोसिएशननुसार (इस्मा), देशात दरवर्षी साधारण ३६० लाख टन मिठाचे उत्पादन होते. त्यापैकी ९० लाख टन मीठ खाद्यान्नासाठी, तर १०० लाख टन मीठ औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. उर्वरित १०० लाख टन मिठाची निर्यात होते. लॉकडाउनमुळे यापैकी जेमतेम १ लाख टन मिठाचे उत्पादन बंद पडले होते, असे असोसिएशनच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.
उत्पादन भरघोस
असोसिएशनचे अध्यक्ष बी. सी. रावल यांनी सांगितले की, देशात जिथे-जिथे मिठाचे उत्पादन होते. त्यापैकी फक्त आठ जिल्ह्यांत लॉकडाउन दरम्यान जेमतेम १० ते १२ दिवस उत्पादन बंद होते. पण आता देशात मीठ उत्पादन होत असलेले सर्व प्रमुख जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यामुळे उत्पादन भरघोस आहे. परिणामी पुरवठादेखील भरपूर आहे.