मुंबई : सरकारने कितीही आश्वासनं दिलीत तरी मजुरांचं होणारं स्थलांतर काही थांबलेलं नाही. अजुनही हजारो मजूर पायीच रस्त्याने आपल्या घराकडे जात असून त्यांच्या कहाण्या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. नाशिकमधून काही मजूर मध्यप्रदेशात निघाले होते. त्यात 9 महिन्यांची एक गर्भवती महिला होती. 70 किमी चालल्यानंतर तिची प्रसृती झाली. त्यानंतर तीने पुन्हा 160 किलोमीटर चालत मध्यप्रदेशची सीमा गाठली. ही महिला नाशिकमध्ये एका कारखाण्यात काम करते. लॉकडाऊनमुळे कारखाना बंद आहे. त्यामुळे कामही थांबलेलं होतं. खाण्यापीण्याची काहीच सोय नव्हती. त्यामुळे आम्हाला निघावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर 70 किमी चालल्यानंतर महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या. सोबतच्या महिलांनी तिचं बाळंतपण केलं. नंतर त्या नवजात बाळाला घेऊन त्या माऊलीचा पुन्हा प्रवास सुरू झाला. 160 किमी चालत गेल्यानंतर चेक पोस्टवर जेव्हा त्यांना अडविण्यात आलं तेव्हा चौकशी केल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनाही गहिवरून आलं. त्यांनी त्या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना त्यांच्या गावी जाण्याचीही सोय केली. असे हजारो मजूर सध्या रस्त्याने जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांमधून रेल्वे सोडण्यात येत असल्याने त्यातूनही हे मजूर आपल्या गावी जात आहेत. त्या त्या राज्य सरकारांनी परवानगी दिल्यानंतर हे मजूर आपल्या राज्यांमध्ये पोहोचत आहेत.
दरम्यान, देशातला लॉकडाऊन संपायला आता केवळ 7 दिवस रहिले आहेत. देशातला लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात आला होता. तो लॉकडाऊन 17 मेला संपणार असून त्यानंतर काय होणार हा प्रश्न देशभर विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (11 मे) देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. पंतप्रधानांची कोरोना प्रकरणा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतची ही 5वी व्हिडीओ कॉन्फरन्स आहे. त्यात कुठला निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, महत्त्वाच्या विभागांचे केंद्रीय सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता ही व्हिसी होणार आहे.