सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी पोलीस, वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ५१ वर्षीय एका करोनाग्रस्त पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नाशिक शहरात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.
शनिवारी सकाळी संबंधित पोलिसाचा करोनाचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. ते मालेगावात आपलं कर्तव्य बजावत होते. कर्तव्यावर असताना त्यांना करोनासारखी लक्षणं असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर २ मे रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे करोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ९० पोलिसांना आतापर्यंत करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १८ जण हे मालेगावातीलच आहेत. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६२२ वर पोहोचली आहे.