आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नाव मोठं करण्यात महेंद्रसिंह धोनीचा मोठा वाटा आहे. आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाला दोन विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा धोनी सध्या भारतीय संघात नाहीये. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संधी दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं क्रिकेटच्या मैदानावरचं पुनरागमन लांबलं आहे.

सध्या लॉकडाउनच्या काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या जुन्या आठवणी सोशल मीडियावर जागतवत आहेत. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने आपला बंगालचा सहकारी मनोज तिवारीसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट करताना धोनीबद्दलची एक आठवण सांगितली. २०१४ साली भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱा केला होता. या दौऱ्यात वेलिंग्टन कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करत त्रिशतक झळकावलं होतं.

अधिक वाचा  महाराष्ट्रात 15 दिवसांत आचारसंहिता?; मविआ 3 दिवस जागावाटप बैठका तर महायुतीची ही अंतिम टप्पा स्थिती?

“माझ्या गोलंदाजीवर ब्रँडन मॅक्युलम १४ धावांवर खेळत असताना विराट कोहलीने त्याचा झेल सोडला. त्यावेळी मला वाटलं की ठीक आहे हरकत नाही, आपण याला बाद करु. मात्र मॅक्युलमने मिळालेल्या संधीचा फायदा घेत आमची चांगलीच धुलाई केली. त्यावेळी मॅक्युलमने चहापानापर्यंत फलंदाजी केली. यानंतर माझ्याच गोलंदाजीवर भारतीय खेळाडूंनी आणखी एका फलंदाजाचा झेल टाकला.

त्यानंतर मला खूप राग आला होता, मी एक बाऊन्सर चेंडू टाकला, जो धोनीच्या डोक्यावरुन जात थेट सीमारेषेबाहेर गेला.”
चौथ्या दिवसाचा खेळ संपताना धोनीने माझ्यापाशी येऊन मला सांगितलं, तुझ्या गोलंदाजीवर मॅक्युलमचा झेल सोडला ही गोष्ट खरी आहे पण तुला तो बाऊन्सर चेंडू टाकण्याची गरज नव्हती. त्यावेळी मी माझ्या हातून चेंडू निसटला असं धोनीला म्हणालो. यावर धोनीने लगेचच, “हे बघ, माझ्यासमोर अनेक लोकं आले आणि गेले, खोटं बोलू नकोस. मी सिनीअर आहे आणि कॅप्टन आहे, मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नकोस. मोहम्मद शमीने मनोज तिवारीसोबत बोलत असताना ही आठवण सांगितली. माझं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण हे धोनीच्या नेतृत्वाखालीच झालं, त्यामुळे मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकल्याचंही शमीने यावेळी मान्य केलं.