अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची दुसरी मुलगी योगिताचे काल लग्न झाले. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अत्यंत साध्या पद्धतीने दगडी चाळीमध्येच हा विवाह पार पडला. योगिता अभिनेता अक्षय वाघमारेसोबत विवाहबद्ध झाली. “श्री शंभूनारायण या शंकराच्या मंदिरात या विवाहाचे विधी पार पडले. दगडी चाळीच्या परिसरातच प्रवेश केल्यानंतरच हे मंदिर आहे. हा पूर्णपणे कौटुंबिक सोहळा होता. मोजकी मंडळी हितचिंतक या लग्नाला उपस्थित होते. लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी मंदिराच्याजवळच अन्न शिजवण्यात आले” अशी माहिती गीता गवळी यांनी मिरर ऑनलाइनला दिली.
गीता अरुण गवळी यांची मोठी मुलगी असून त्या आग्रीपाडयामधून नगरसेविका आहेत. ‘लॉकडाउन संपल्यानंतर कदाचित लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात येऊ शकतो’ असे गीता गवळी यांनी सांगितले. लग्नाचे घर असले कि, तिथे मंडप टाकण्यात येतो, रोषणाई करण्यात येते. पण दगडी चाळीत असा कुठलाही मंडप उभारण्यात आला नव्हता किंवा रोषणाई केली नव्हती. फक्त ज्या मंदिरात लग्न होते ते फुलांनी सजवण्यात आले होते. म्युझिक, बँजो किंवा सनई-चौघडे असे कुठलेही वाद्य ठेवण्यात आले नव्हते.
लग्नानंतर दुपारचे भोजन करुन वधू-वर दोघेही पुण्याला रवाना झाले. हे लग्न २९ मार्चला होणार होते. दक्षिण मुंबईतील एक मोठया हॉटेलमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने हे लग्न पुढे ढकलावे लागले. डॉन अरुण गवळी यांना पाच मुले आहेत. त्यांच्या दोन मुलांची लग्न झाली आहेत.
योगिताची मुंबईमध्ये स्वत:ची एनजीओ आहे. त्या माध्यमातून ती समासेवेमध्ये सक्रीय आहे. योगिताच नवरा अक्षय अभिनेता आहे. अक्षयच्या कुटुंबाने लग्नासाठी मुंबईला येण्यासाठी पोलिसांकडून विशेष परवानगी घेतली होती. अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहेत. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी ते नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.