तिरुवनंतपुरम : कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोर पाळण्याकरिता छत्री वापरण्याची अनोखी कल्पना केरळमधील एका गावातल्या रहिवाशांनी अमलात आणली आहे. छत्री उघडून चालणाऱ्या दोन माणसांमध्ये आपसूकच सुमारे एक मीटरचे अंतर राहते. या युक्तीचे अनुकरण आता तमिळनाडू, ओडिशा, आंध्र, तेलंगणातील लोकांनीही सुरू केले आहे.
केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांना सुचलेली ही कल्पना अलपुळा जिल्ह्यातील तन्नीरमुक्कोम या गावातल्या रहिवाशांनी सर्वप्रथम अमलात आणली. हाऊसबोटींसाठी प्रसिद्ध असलेले अलपुळा हे जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आवडते ठिकाण आहे. या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आतापर्यंत फक्त पाच रुग्ण सापडले. उपचारनंतर ते सर्व जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी तन्नीरमुक्कोम गावाने राबविलेल्या छत्री मोहिमेचे अनुकरण आता तमिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतील लोकांनीही सुरू केले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. कडक उन्हापासून वाचण्यासाठी कामाला येणारी छत्री आगामी पावसाळ्यात तर निकडीची गोष्ट आहे. अशा बहुगुणी छत्रीचा उपयोग फिजिकल डिस्टन्सिंगसाठी उत्तमरीत्या होत असल्याने केरळच्या अर्थमंत्र्यांच्या युक्तीला सर्वत्र दाद मिळत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे मोफत वाटप
फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तन्नीरमुक्कोम या गावातील प्रत्येक रहिवाशाला सवलतीच्या दरात छत्री देण्याचा निर्णय तेथील ग्रामपंचायतीने घेतला आहे. तन्नीरमुक्कोम गावातील प्रत्येक रहिवाशाने घराबाहेर निघताना सोबत छत्री घेऊनच निघावे, असे बंधन ग्रामपंचायतीने घातले आहे. गावातील ८० आरोग्य व अंगणवाडीतील कर्मचाºयांना छत्र्या मोफत देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  आत्राम, मुश्रीफांनंतर तानाजी सावंत भरणेमामांचा ‘करेक्ट कार्यक्रम’; महायुतीच्या ‘दिग्गजां’ची पवारांच्या भेटीस गर्दी