बारामती : महाराष्ट्र शासन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देत आहे, मात्र पंजाब, कर्नाटक, उत्तरप्रदेश ही राज्ये आपल्याच नागरिकांना स्वीकारण्यास पुढाकार घेताना दिसत नाहीत. बारामती शहर व तालुक्यात असे सुमारे 3 हजार 500 परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत. संचारबंदीच्या वाढत्या कालावधीमुळे आता या मजुरांचा धीर खचू लागला असून आम्ही चालत जाऊ पण आम्हाला आमच्या घरी जाऊद्या असा गहिवर हे मजूर घालू लागले आहेत. कोरोनामुळे 18 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने तर 22 मार्च रोजी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली. त्यामुळे बारामती तालुक्यात सुमारे 3 हजार 500 मजूर अडकून पडले आहेत. बागायती क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, एमआयडीसी, यामुळे बारामती परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी आहे. येथील तहसीलकार्यालयात या मजुरांनी आपापल्या घरी जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील केले आहेत.ज्या मजुरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि जाण्यासाठी वाहनाची सोय झाली आहे अशा मजुरांना त्यांच्या घरी जाण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र हे मजूर ज्या राज्यातील आहेत त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील परवानगी देणे गरजेचे आहे. कर्नाटक, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांकडून अपेक्षित प्रतिसाद तातडीने मिळत नाही.त्यामुळे हे मजूर राज्याच्या सीमेवर अडकून पडतात. जोपर्यंत संबंधीत राज्याचे स्थानिक प्रशासन या मजुरांना स्वीकारण्याची तयारी दर्शवत नाही.तोपर्यंत या मजुरांना जाण्याची परवानगी देता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संबंधित राज्यातील स्थानिक प्रशासनाकाडे या मजुरांची यादी पाठवली आहे. त्यांची परवानगी मिळाली की या मजुरांना त्यांच्या घरी जाता येईल, अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
तुमच्या पाया पडतो आम्हाला घरी जाऊ द्या…
गुणवडी (ता.बारामती) येथील अमित कुंभार यांच्या वीटभाट्टीवर सिंधगी (जि. विजापूर, कर्नाटक) येथील 17 मजूर अडकून पडले आहेत. यामध्ये 8 महिला, तीन लहान मुले व 6 पुरुष आहेत. कुंभार यांनी मागील दीड महिना या मजुरांचा सांभाळ केला आहे. आताही या मजुरांना जीवनावश्यक वस्तू ते पुरवत आहेत. मात्र कोणाची लहान मुले गावी आहेत, तर कोणाचे वृद्ध आई-वडील, तसेच नुकतेच लग्न झालेली नववधु माहेरपणासठी आली ती इकडेच राहिली. तर एक तीन वषार्चा चिमुकला आईपासून दूर आला. या सर्वांची सोय होत असली तरी त्यांची येथे राहण्याची मानसिकता राहिली नाही. काही करा, तुमच्या पाया पडतो, पण आम्हाला आमच्या घरी आमच्या माणसात जाऊ द्या.डोळ्यात पाणी आणून हे मजूर विनंती करताना दिसत आहेत. संचारबंदी किती दिवस राहील. आपली जिवाभावाची माणसं भेटतील का नाही या शंकानी या मजुरांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे. आम्ही चालत जाऊ पण आम्हाला आता अडवू नका, असा टाहो हे मजूर फोडत आहेत.
बारामतीमध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर…
कर्नाटक – 201
बिहार – 300
छत्तीसगड – 345
झारखंड – 114
पश्चिम बंगाल- 153
आंध्रप्रदेश – 41
गुजरात – 1
महाराष्ट्र (इतर जिल्ह्यातील ) – 910