मुंबई: औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे.
शरद पवार यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेक मजूर महाराष्ट्रात अडकून पडले आहेत. त्यांना गावाला जायचे असल्याने हे लोक पायी चालत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी. महाराष्ट्र सरकारने या मजुरांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुम्हीही जास्तीत जास्त रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी गोयल यांच्याकडे केली असून गोयल यांनीही मजुरांसाठी अधिकाधिक रेल्वे सोडण्याचं आश्वासन दिलं आहे. पवार यांनी राज्यातील मजुरांच्या समस्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली.
दरम्यान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यातील नागरिकांना स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड राष्ट्रवादीत ‘गिरीश’ नावाचा दृढ ‘नवांकुर’; …फक्तं साहेबांसोबत या विचाराला अर्पित ‘आयुष्यवेल’ही बहरतेय