लुधियाना : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, पंजाबमधील कपूरथला इथं एका गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी छापा टाकून तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील कपूरथला पोलिसांनी शुक्रवारी लॉकडाऊनच्या काळात नन्हा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका गेस्ट हाऊसवर छापा मारला. याठिकाणी दोन तरुणी, एक तरुण आणि गेस्ट हाऊसच्या मालकाला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा शटर बंद होतं पण आत सेक्स रॅकेट सुरू होतं.
पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला तेव्हा गेस्ट हाऊसचा मालकही तिथंच होता. गेस्ट हाऊसमधील रूम चेक करताना एका खोलीत दोन तरुणी आणि एक तरुण सापडला. पोलिसांना पाहताच त्यांनी कपडे घातले. त्यानंतर पोलिसांनी इतर खोल्यांमध्येही झडती घेतली. छापा टाकलेल्या ठिकाणचे जुने सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी तपासले. त्यातही संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ठाण्यात आणलं. या कॉम्प्लेक्सचा आणखी एक मालक दिल्लीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या या अवैध गेस्ट हाऊसची याआधीही तक्रार आली होती. आज छापा टाकताच तिथं रंगेहात काही जणांना पकडण्यात आलं. यामध्ये दोन तरुणी, एक तरुण आणि गेस्ट हाऊसचा मालक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कर्फ्यूचं उल्लंघन केल्याचा गुन्हाही नोंद होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.