मुंबई: महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर नगरविकास विभागाच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारण्याऐवजी प्रवीण परदेशी यांनी रजेसाठी अर्ज केला आहे. वैयक्तिक कारणास्तव रजेवर जात असल्याचं परदेशी यांनी त्यांच्या रजेच्या अर्जात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना परदेशी यांनी रजेचा अर्ज केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबईत आणि त्यातही धारावीत करोनाचे रुग्ण अधिक आढळल्याने केंद्रीय पथकाने मुंबईत पाहणी करून महापालिकेला काही सूचना केल्या होत्या. परंतु त्याची अंमलबजावणी न करण्यात आल्याने या पथकाने सरकारकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल रात्री परदेशी यांची बदली करण्यात आली. त्यांना नगरविकास खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर इक्बाल चहल यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. बदली आदेश येताच चहल यांनी रात्रीच पदाची सूत्रे स्वीकारली होती. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने अधिकाऱ्यांनी सुट्ट्या घेणं टाळलं आहे. असं असताना परदेशी यांनी आज त्यांच्या पदाची सूत्रे स्वीकारणं अभिप्रेत होतं. मात्र, त्याऐवजी त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी रजा मागितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार असल्याने सोमवारी परदेशी यांच्या अर्जावर निर्णय होणार असून अन्य अधिकाऱ्याकडे परदेशी यांच्या विभागाचा अतिरिक्त भार देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भिडे, जयस्वाल यांनी स्वीकारली सूत्रे
दरम्यान, मुंबई महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून अश्विनी भिडे आणि संजीव जैस्वाल यांनी कार्यभार सांभाळला आहे. अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेतील २४ वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांनी आतापर्यंत राज्यात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या विभागीय अतिरिक्‍त आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्‍त आयुक्‍तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव म्‍हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे. त्‍याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून त्‍यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्‍याच्‍यादृष्‍टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्‍या निर्मितीत महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे.
तर, संजीव जयस्‍वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्‍या तुकडीचे अधिकारी असून त्‍यांनीही आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक व तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उपमुख्‍यमंत्र्यांच्या कार्यालयात उपसचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्‍हणून जयस्‍वाल यांनी काम पाहिले आहे. त्‍यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.

अधिक वाचा  मुंबई महानगरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम; मेगा प्रोजेक्ट्समुळे क्रांतिकारी बदल