नवी दिल्ली: मद्य उत्पादन आणि विक्रीतून राज्य सरकारांना मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळेच लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. सर्व साधारणपणे मद्यापासून राज्यांना २५ टक्के उत्पन्न मिळते. पण सध्या जीएसटी आणि अन्य उत्पादनाची साधने कमी झाल्यामुळे हे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यांसाठी मद्यापासून मिळणारे उत्पन्न एकमेव साधन ठरले आहे.
मद्य विक्रीस परवानगी दिल्यानंतर सोशल डिस्टसिंगचे वाजलेले तीन तेरा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर कोर्टाने देखील राज्य सरकारांना विचार करण्यास सांगितले आहे. आता सर्व ऑनलाईन मद्य विक्रीच्या योजनेवर काही राज्ये काम करत आहेत. जाणून घेऊयात कोणत्या राज्यात सर्वाधिक मद्याची विक्री होते आणि कोणत्या राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळते.
दिल्लीत मद्यावर ७० टक्के करोना कर
देशाची राजधानी दिल्लीत मद्यावर ७० टक्के करोना कर लावण्यात आला आहे. पण संपूर्ण देशाचा विचार केल्यास एकूण मद्यापैकी दक्षिणेतील पाच राज्ये निम्मे मद्य पितात. पण या राज्यांना मिळणारा महसूल मात्र १० ते १५ टक्के इतकाच आहे. लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी मद्यावरील कर वाढवला आहे.
या पाच राज्यात ४५ टक्के मद्याची विक्री
क्रिसिलच्या रिपोर्टनुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात ४५ टक्के मद्याची विक्री होते. पण या सर्वाना मिळणारा महसूल मात्र १० ते १५ टक्के इतकाच आहे. तामिळनाडू आणि केरळला १५ टक्के, आंध्र आणि कर्नाटकला ११ टक्के तर तेलंगणाला एकूण उत्पन्नापैकी १० टक्के उत्पन्न मद्य विक्रीतून मिळते.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कर
देशात मद्यावर सर्वात जास्त कर महाराष्ट्रात घेतला जातो. पण राज्याच्या एकूम उत्पन्नात त्याचा वाटा फक्त ८ टक्के इतका आहे. तसेच राज्यात देशातील एकूण मद्य विक्री पैकी ८ टक्के विक्री महाराष्ट्रात होते. दक्षिणेतील पाच राज्ये महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात मिळून ७५ टक्के मद्याची विक्री होते. मद्याची विक्री परवानगी या राज्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण देशातील ८५ टक्के करोना रुग्ण या राज्यांत आहेत. यातील सर्वाधिक ३१.२ टक्के रुग्ण महाराष्ट्रात, १० टक्के दिल्लीत, ७.६ टक्के तामिळनाडूत, मध्य प्रदेशात ७ टक्के आणि उत्तर प्रदेशात ५.९ टक्के रुग्ण आहेत. या सर्व राज्यात केरळ १ टक्क्यासह सर्वात खाली आहे.

अधिक वाचा  काटोलमधून अनिल देशमुखांपुढे तगडं आव्हान, श्रीकांत जिचकरांचे पुत्र याज्ञवल्क्यने ठोकला शड्डू!