नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांची संख्या जवळपास ६० हजारांपर्यंत पोहचली आहे. अशा वेळी देशातील २०० हून अधिक असे जिल्हे आहेत जे सध्या करोनामुक्त आहेत. तर काही असेही जिल्हे आहेत ज्यांना करोनानं घट्ट विळखा घातला आहे. देशातील जवळपास ७५ जिल्ह्यांत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून येतंय. ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नं (ICMR) आता या ७५ जिल्ह्यांचा अभ्यास सुरू करण्याची योजना बनवलीय. त्यामुळे या जिल्ह्यांत करोनाच्या समूह संसर्गाचा धोका सुरू झालाय का? याबद्दल अभ्यास केला जाईल.
या ७५ जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे. यामध्ये दिल्लीचे सर्व जिल्हे, मुंबई, पुणे, ठाणे, आग्रा, अहमदाबाद यांसारख्या शहरांचा यात समावेश आहे. मुंबईत जवळपास १२ हजारांहून अधिक, दिल्लीत ६ हजार, अहमदाबादमध्ये ५ हजार तर पुणे-ठाण्यात दोन-दोन हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. इंदोरमध्ये १७००, जयपूरमध्ये १०००, जोधपूर आणि सूरतमध्ये ८००-८०० तर आग्र्यात ७०० हून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत.
राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात सिव्हियर एक्युट रेस्पिरटरी इलनेस (SARI) अर्थात श्वसनपक्रियेत अडथळा आणि इन्फ्लुएन्जा (ILI) यांसारख्या आजारांच्या कमीत कमी २५० सॅम्पल्सची चाचणी करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.
याअगोदर या जिल्ह्यांच्या अभ्यासासाठी रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसच्या सहाय्यानं चाचणी करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी केली होती. परंतु, या किटसचे निकालच्या निकालांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं ही योजना स्थगित करण्यात आली. आता या जिल्ह्यांत ELISA (एन्जाइमलिंक्ड इम्युनोसोर्बेट असे) टेस्ट किटच्या सहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे. ELISA किटही व्यक्तीच्या रक्तातील अँटीबॉडीच्या सक्रियतेचा शोध लावण्यासाठी वापरल्या जात आहेत. देशात करोनाचा समूह संसर्गाचे पुरावे अजूनही मिळालेले नाहीत, असंही आयसीएमआरनं म्हटलंय.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?