भोपाळ : देशभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने या संकटाशी सामना करणं आवश्यक आहे. देश एकसंध असेल तर कोरोनाचं संकटही पार करणं अवघड जाणार नाही. असंच एक प्रेरणादायी उदाहरण कैद्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. भोपाळ सेंट्रल जेलमध्ये कोविड 19 च्या जीवघेण्या आजारात हिंदू-मुस्लिमांमधील बंधूप्रेम अबाधित आहे. सध्या रजझानचा पवित्र महिना सुरू आहे. मुस्लिमांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो.
अशात तुरुंगातील 150 हिंदू कैदी मुस्लीम कैद्यांसाठी मध्यरात्री उठून सहरी म्हणजेच न्याहरी तयार करतात. इतकचं नाही तर सायंकाळी इफ्तारीसह जेवणही हिंदू कैदीच तयार करतात. भोपाळ तुरुंगात तब्बल 3000 कैदी आहेत. यापैकी 500 कैदी मुस्लीम आहेत. या सर्व मुस्लीम कैद्यांचा रोजा सुरू आहे.
तुरुंग प्रशासनाकडून मुस्लीम कैद्यांची घेतली जातेय काळजी
लॉकडाऊनपूर्वी तुरुंग प्रशासनाव्यतिरिक्त बाहेरील संस्थांकडून इफ्तारी आणि खाण्याची व्यवस्था केली जाते. या मुस्लीम कैद्यांसाठी मध्यरात्री 3 वाजता उठून 150 हिंदू कैदी सहरी तयार करतात. या सहरीत कैद्यांना चहा आणि रोटी दिली जाते. शिवाय सायंकाळी इफ्तारीची जबाबदारी हिंदू कैद्यांवर आहे. यामध्ये कलिंगड, फळे, खजूर आणि दूध दिले जाते. सायंकाळचे जेवणही हेच तयार करतात. जेवण बनविताना आणि नमाज अदा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. मुस्लीम कैद्यांना जेवणात वरण-भात, भाजी आणि पोळी दिली जाते. त्याचा रोजा सुरू असल्याने मुस्लीम बांधवांवर ताण येऊ नये यासाठी हिंदू बांधवांकडून या महिन्यातील संपूर्ण जेवणाची जबाबदारी घेतली जात आहे.

अधिक वाचा  मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण; तिसऱ्या टर्ममध्ये घेणार मोठा निर्णय? देशभरात लवकरच निवडणुका…