नवी दिल्ली : करोनाचा फैलाव संपूर्ण जगभर पसरलाय. अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स यांसारख्या विकसित देशांचंही आर्थिकरित्या कंबरडं मोडलंय. लाखो जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. परंतु, भारतात कोविड १९ ची परिस्थिती इतकी वाईट नाही, देश वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. अनेक विकसित देशांत जी परिस्थिती दिसते, त्या स्थितीत भारतात तयार होईल असं दिसत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
करोना रुग्णांच्या संक्रमणाचा दर दुप्पट होण्यासाठी सध्या ११ दिवसांचा कालावधी लागत आहे. गेल्या सात दिवसांवर नजर टाकली तर हाच दर ९.९ दिवसांचा होता. देशात करोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा दर ३.३ टक्के आहे, हा जगातील सर्वात कमी मृत्यू दरांपैंकी एक आहे. याशिवाय भारतातील रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचं प्रमाण) २९.९ टक्के आहे, हे सगळे चांगले संकेत असल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
देशात नव्या करोना प्रोटोकॉलनुसार, सौम्य करोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी टेस्टिंगची गरज नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत आणि परिस्थिती सामान्य असेल तर त्याला १० दिवसांत रुग्णालयातू सुटी दिली जाईल. रुग्णालयातून परतल्यानंतर या रुग्णांना १४ दिवसांऐवजी ७ दिवसांपर्यंत होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. १४ व्या दिवशी टेली कॉन्फरन्सद्वारे या रुग्णांचा फेरआढावा घेतला जाईल.
दरम्यान, भारताती करोनाबाधितांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहचलीय. यातील, १९८१ जणांनी आपला जीव गमावलाय तर १७ हजार ८४७ जण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ३९ हजार ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. जगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमेरिकेत सर्वाधिक १३ लाख २२ हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळलेत. यातील जवळपास ७८ हजार ६१६ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.