मुंबई: राज्यात २१ मे रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षातील निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये नाराजीची लाट आल्याचे दिसत आहे. कालच एकनाथ खडसे, राम शिंदे या बड्या नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केली होती. यामध्ये आता कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भर पडली आहे. मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर एक शेर पोस्ट केला आहे. त्याचा एकंदर अर्थ पाहता मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज असल्याचे दिसते.
मेधा कुलकर्णी या कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने मेधा कुलकर्णी यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर काहीसे नाराजीचे वातावरण होते. अनेकांनी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ‘उपऱ्या’ उमेदवाराला विरोध केला होता. मात्र, अमित शहा यांनीच मला कोथरूडमधून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानत नाईलाजाने कोथरूडच्या लढाईतून माघार घेतली होती. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी आता विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून ट्विटच्या माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपमधील नाराजांची संख्या अशीच वाढत राहिल्यास आगामी काळात पक्षात बंडाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यस्तरावर याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो. भाजपने काल विधानपरिषदेच्या चार जागांसाठी प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षित असलेल्या एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचा पत्ता कट झाला होता. अशातच रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या अलीकडेच पक्षात आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरल्याचे सांगितले जाते. एकनाथ खडसे आणि राम शिंदे या बड्या नेत्यांनी कालच आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तर पंकजा मुंडे यांनीही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.