महाराष्ट्रासह देशातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. कारण महाराष्ट्रातील पहिला जिल्हा पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश जारी करुन जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजतापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील केस कर्तनालयेही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केस कर्तनालयात एका वेळी एकाच ग्राहकास प्रवेश देऊन केस कापावे, दुकानदार व कारागिराने स्वत:च्या चेहऱ्यावर मास्क बांधावा, वारंवार एकच कापड वापरला जाणार नाही याची दक्षता दुकानदाराला घ्यावी लागणार आहे. सर्व रुग्णालये, पॅथालॉजी केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे, औषध विक्रेते यांना वेळेचं बंधन राहणार नाही. ऑटो रिक्शा व सायकल रिक्शामध्ये एक चालक व दोन प्रवासी घेऊन वाहतूक सेवा सुरु करता येईल.
चप्पल तुटली तरी थांबला नाही प्रवास! पायात पाण्याच्या बाटल्या बांधून धरली वाट
हे सर्व करताना सामाजिक अंतर ठेवून शासनाचे नियम पाळावेच लागतील. तसेच सर्व व्यक्तींच्या आंतरजिल्हा हालचाली विनापरवाना बंदच राहतील. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने प्रशासकीय कारणास्तव वाहतूक करता येईल आणि जिल्ह्यांतर्गत प्रवासाला कोणत्याही पासची गरज नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
सर्व उपहारगृह नास्ता सेंटर कापड दुकाने इलेक्ट्रॉनिक सह सगळया साहित्य विक्रीच्या दुकानाना परवानगी देण्यात आली आहे.