नवी मुंबई: करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं खबरदारी म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) ११ ते १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात एपीएमसी मार्केटमधील अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे.
काही दिवसांपासून एपीएमसी मार्केट परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं व्यापारी, माल वाहतूकदार आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं मार्केट बंद ठेवण्यात यावं, अशी मागणी होऊ लागली. यासंदर्भात आज, शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. अनेक व्यापारी संघटनांनी एपीएमसी प्रशासनाकडे मार्केट बंद ठेवण्याची मागणी केली. अखेर या बैठकीत मार्केट ११ ते १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, स्थानिक आमदार गणेश नाईक यांनी मार्केट तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी केली होती. एपीएमसी मार्केट पुन्हा सुरू करण्यासंबंधी १५ मे रोजी फेरआढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘मार्केट बंद राहणार असून, फेरआढावा घेण्याआधी या काळात मार्केटच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला सर्व जीवनावश्यक वस्तू थेट मुंबईला नेण्यात येत असून, यादरम्यान सर्व नियमांचे पालन केले जाते,’ अशी माहिती एपीएमसी मार्केटचे उपसचिव कृष्णकांत पवार यांनी दिली. ‘या कालावधीत सर्व व्यापारी, मालवाहतूकदार, कामगारांची स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे,’ असं एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळ १००दिवस पूर्ण मंत्रिमंडळाचा one Nation One Election मोठा निर्णय