नवी दिल्ली : करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारमध्ये पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसून येतंय. याची सुरुवात झाली ती केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना उद्देशून लिहिलेल्या पत्रानंतर… या पत्रातून अमित शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारकडून गरीब मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी योग्य ते सहकार्य न मिळण्याबाबत तक्रार करण्यात आली होती. यावर, अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केलाय.
गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून, स्थलांतरी मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली होती. ‘प्रवासी मजुरांसोबत पश्चिम बंगाल पोहचणाऱ्या रेल्वेला राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात येतेय. या मजुरांना आपल्या राज्यात परतू न देणं हा अन्याय आहे. यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो’ असं अमित शहा यांनी म्हटलं होतं.
प्रवासी मजुरांच्या प्रश्वावर ममता बॅनर्जी गप्प का आहेत? त्यांनी मजुरांसाठी योग्य ती पावलं उचलावीत, पश्चिम बंगालमध्ये प्रवासी मजूर अधिक चिंतेत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आलंय. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालचे प्रवासी मजुरही आपल्या राज्यात जाण्यासाठी व्याकूळ आहेत. त्यांची जाण्याची व्यवस्थाही केंद्रानं केलीय. परंतु, मला दु:ख आहे की पश्चिम बंगाल सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असंही अमित शहा यांनी म्हटलं.
यावर तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी, ‘या संकटकाळात आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरणारे केंद्रीय गृह मंत्री कित्येक आठवड्यांनंतर गप्प राहून आता बोलत आहेत… खोट्या वक्तव्यांसहीत लोकांची दिशाभूल करत आहेत. विडंबना म्हणजे याच सरकारनं लोकांना वाऱ्यावर सोडून दिलंय. शहांनी आपले खोटे आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी’ असं ट्विट केलंय.