मुंबई : महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले तसेच ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळू, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढेही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (8 मे) समाजमाध्यमातील थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
अस्वस्थ होऊ नका मुख्यमंत्र्यांचे आवाहन
औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाताने व्यथीत झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील मजूर-कामगार आणि लोकांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या राज्याबरोबर, केंद्र सरकारबरोबर बोलणी सुरु असून तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, रेल्वे, बसची व्यवस्था करण्यात येत आहे त्यामुळे संयम सोडू नका, अस्वस्थ होऊ नका,गर्दी करू नका आणि अफवांना बळी पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्य सुविधेत वाढ
कोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत. हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचाही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यताही दिली आहे. सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलिसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलिसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.
हॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही
हॉस्पीटलधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. पण हे करतांना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये. टास्कफोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आपल्यासोबत आहेत, ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत. तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे रेड झोनमधील नियम अधिक कडक करतांना इतरत्र काही अटी आणि शर्थीच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरु केले आहेत. लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतू साखळी तोडण्यात अजून यश आले नाही. अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसे होऊ नये, आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधने पाळू आणि ही साखळी तोडू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
2 लाख चाचण्या..
परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाणार आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दोन लाखाच्या आसपास राज्यात कोरोना चाचण्या झाल्या आहेत. काही जण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत त्यामुळे इच्छा असूनही त्यांना वाचवता येत नाही. जर सर्दी, पडसे आणि खोकला असेल तर न घाबरता फिव्हर रुग्णालयात स्वत: येऊन तपासणी करून घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.
सव्वा तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाच्या १८ हजार केसेस पैकी सव्वातीन हजार लोक बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या वाढते आहे काही गर्भवती महिला ज्या कोरोना पॉझेटिव्ह आहेत त्या प्रसुत झाल्यानंतर बाळाला कोरोनाची लागण नाही हा चमत्कारही दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक वाचा  मराठवाड्यात भाजप शून्यावर; मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु; एकदिवसीय अधिवेशनचीही दाट शक्यता