रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीर जोडीने भारतीय संघाचं यशस्वीपणे प्रतिनिधीत्व केलं आहे. दोन्ही खेळाडूंनी अनेक सामन्यात भारतीय संघाला भक्कम सुरुवात करुन दिली आहे, अनेक विक्रमही या जोडीच्या नावावर जमा आहेत. पण रोहित शर्माने आपल्या सलामीवीर सहकाऱ्याबद्दल काही खास गोष्टी समोर आणल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलत होता.
शिखर धवन फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर चांगला खेळतो, पण ज्यावेळी फटकेबाजीची वेळ येते त्यावेळी तो त्यांच्यावर फारसा प्रहार करत नाही. त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो, रोहित शिखरविषयी बोलत होता. “शिखर धवन वेडा माणूस आहे, त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो. त्याला फिरकीपटूंना फटकेबाजी करायची नसते. कधीकधी तो खूप विचित्र वागतो. कधीकधी तुम्ही सामन्यात एखादी रणनिती आखत असता आणि पाच सेकंदांनी हा माणूस विचारतो, काय म्हणत होतास?? विचार कर, तुम्ही सामन्यात खूप तणावाखाली असता आणि हा माणूस असं काहीतरी बोलून जातो. अशा गोष्टींमुळे तुम्हाला कधीकधी राग येतो.”
असं असलं तरीही रोहित-शिखर जोडीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली आहे. २०१३ ते २०२० या काळात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित-शिखर जोडीच्या नावावर ४९०२ धावा जमा आहेत. २०१९ च्या अखेरीस शिखर धवनला दुखापतीमुळे ग्रासलं होतं, त्याच्या जागेवर लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आलं होतं. दुखापतीमुळे धवनला अजुनही भारतीय संघात म्हणावं तसं पुनरागमन करता आलेलं नाही.