श्रीरामपूर : टाळेबंदी सुरु असतानाही दारु विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता त्यामुळे अपघात तसेच खुनासारख्या गंभीर घटना पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दारुच्या नशेतील चालकाने मालवाहू मोटारीची धडक दिल्याने दोन शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला होता. तर आज मुठेवाडगाव (ता.श्रीरामपुर) येथे दारुच्या नशेत सावत्र सासऱ्याने जावयाचा खून केल्याची घटना घडली.
दारु विक्री सुरु झाल्यानंतर शहरात नियमाचे पालन होत नसल्याने तसेच प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करुन जमावाला पांगविले होते. तसेच दारु दुकाने सुरु करण्यास परवानगी नाकारली. बेलापूर येथे दारु दुकानांना परवानगी देण्यात आली. मात्र शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यतील गंगापूर व वैजापूर तसेच राहुरी, राहाता या तालुक्यातूनही लोक येऊ लागल्याने प्रचंड गर्दी उसळली. अखेर ही दुकाने बंद करण्यात आली आहेत. असे असले तरी सध्या सर्वत्र दारु उपलब्ध झाली असून अन्य भागातून दारुची आवक वाढली आहे. तसेच दारुमुळे अपघात व गुन्हेही वाढू लागले आहेत.
दारुच्या नशेतील चालकाने मालवाहू मोटारीची धडक दिल्याने गोंधवणी परिसरातील अर्चना मंगेश तिडके (वय ४०) व रंजना गोरक्षनाथ सरोदे (वय ४२) या दोन शेतमजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या महिला संध्याकाळी शेतावर मजुरी करुन घरी निघाल्या होत्या. या मालवाहू मोटारीच्या काचेवर दारुचे परमीट चिटकवलेले होते. तसेच चालकही नशेत होता, असे सरपंच भरत तुपे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.
मुठेवाडगाव येथे सोन्याच्या दागिन्याची मागणी केल्यानंतर भांडण झाले. त्यातून मयूर आकाश काळे (वय २८) या तरुणाचा सासऱ्याने मित्राच्या मदतीने लोखंडी पाईप व तलवारीने बेदम मारहाण करुन खून केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी,की मुठेवाडगाव येथे शेती महामंडळाची पडीक जमीन आहे. या जमिनीत अतिक्रमण करुन बाहेरगावाहून आलेली चार कुटुंबे रहातात. आरोपी सचिन काळे हा येथेच राहून मोलमजुरी करतो. त्याचा जावई मयूर काळे हा मूळचा कर्जतचा असून तोदेखील सासूरवाडीलाच रहातो. पाच वर्षांपासून त्याचे गावातच वास्तव्य आहे. काल आरोपी सचिन काळे याने जावई मयूर व त्याची पत्नी मोनिका (वय २३) या दोघांकडे दागिण्यांची मागणी केली. त्यातून भांडण झाले. हा वाद विकोपाला गेला. अखेर मित्राच्या मदतीने सासऱ्याने जावई मयूरचा काटा काढला.
पोलीस ठाण्यात मोनिका काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात सासरा सचिन काळे म्(रा. मुठेवाडगाव, ता.श्रीरामपूर), संदिप काळे, (रा.भेंडाळा, ता.गंगापूर) व बुंदी काळे (रा. मिरजगाव, ता.कर्जत) व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले असून संदीप काळे हा फरार आहे. मयत मयूर काळे याच्याविरुद्ध पूर्वी चोऱ्याचे गुन्हे दाखल होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून तो मुठेवाडगाव येथे शेतमजुरीचे काम करत होता. गावात टाळेबंदी असतांना दारुची विक्री सुरु होती. त्यासंबंधी पोलिसांनी चौकशी केली होती. तसेच आरोपी सचिन काळे हा खिसे कापण्याचा धंदा करत होता. त्याची माहिती पोलिसांना मयत मयूर काळे हाच देतो, असा आरोपींचा समज होता. त्यातून मागील आठवडय़ात भांडणेही झाली होती. तसेच चोरीच्या सोन्याच्या वाटपावरुनही वाद विकोपाला गेले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षक मसूद खान व सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

अधिक वाचा  ठाकरे भाजपाला भिडण्यास तयार ‘मविआ’चा मुंबईतील 20-18-7-1 फॉर्म्युला?; माध्यमाकडे संपुर्ण यादीच आली