पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीचे विद्यार्थी पुण्यात अडकले होते. त्यांना सुखरुप आपल्या घरी सोडण्यात यावे अशी मागणी मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी केली होती. दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना आपल्या घरी सोडण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार अवघ्या १२ तासांत हे विद्यार्थी बसने आपल्या मूळगावी जाण्यास निघाले आहेत.

एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात वास्तव्याला असलेले हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थी टाळेबंदीमुळे स्वतःच्या गावी जाऊ शकत नव्हते. यावेळी या विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांनी स्वतःची कैफियत मांडली होती. या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधून ह्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि अडचण त्यांच्या निदर्शनास आणली होती.
मंत्रालयातील प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आणि विद्यार्थ्यांची पहिली बॅच एस.टी बसेसने पुण्याहून त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाली. विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्य एमपीएससी समन्वय समितीने यासाठी अमित ठाकरेंचे ट्विटद्वारे आभार मानले आहेत.

अधिक वाचा  UPI व्यवहाराबाबत नवा नियम, आता 500000 रुपयांपर्यंत करता येणार डिजिटल पेमेंट!