मुंबई: लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने मुंबईत अडकलेल्या गुजरातमधील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घराकडे जायचे आहे. या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी आम्ही तयार आहोत. काँग्रेस त्यांचा प्रवासाचा खर्च करण्यास तयार आहे. त्यामुळे गुजरात सरकारवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. असं असतानाही गुजरात सरकार आपल्याच रहिवाश्यांना स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे या मजुरांची मोठी कोंडी झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.
गुजरातच्या कच्छमधील सम्खियाली येथील १२०० गुजराती नागरिक मुंबईत अडकून पडले आहेत. या सर्वांना त्यांच्या राज्यात पाठवण्यास आम्ही तयार आहोत. मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या या गुजराती नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा रेल्वे खर्च उचलण्यासही काँग्रेस तयार आहे. असे असतानाही गुजरात सरकारने या नागरिकांना गुजरातमध्ये येण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. गुजरात सरकार आपल्याच नागरिकांना राज्यात प्रवेश देण्यास नकार देत आहे. ही अत्यंत दुर्देवी बाब आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
गुजरातप्रमाणेच ओडिशा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधील नागरिकही महाराष्ट्रात अडकून पडले असून या नागरिकांनाही त्यांच्या राज्यात पाठवण्याची संबंधित राज्य सरकारांनी अद्याप परवानगी दिली नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.