नवी मुंबई : करोनामुळे हाऊ घतलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा कार्यकाल गुरुवारी (७ मे) रोजी संपला आहे. त्यामुळे उद्यापासून नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू होत आहे. प्रशासक म्हणून पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाची एकहाती सत्ता आहे. नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केल्यामुळे पालिका भाजपच्या ताब्यात गेली आहे. नाईकांचे या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरम्यानच्या काळात करोनाचे संकट आले आणि पालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे नियमानुसार लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया न झाल्याने पालिकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांचीच प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे आता सर्व अधिकार पालिका आयुक्तांना असणार आहेत. त्यांच्या अधिकारात पालिकेचा कार्यभार होणार असल्याची माहिती पालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी दिली आहे.
पालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्याने कायद्यानुसार राज्य शासनाने प्रशासकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सर्व कारभार आपल्या अधिकारात करण्यात येणार आहेत.
– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका
नवी मुंबई महापालिकेत पाच वर्षांत चांगला कारभार झाला. माझ्या अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात शहराची अनेक विकास कामे करण्यात आली. त्यामुळे मी समाधानी आहे. निवडणुकांअभावी प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. आपणास अधिकार नसले तरी महापौर म्हणून कायम राहणार आहे.
– जयवंत सुतार, महापौर

अधिक वाचा  नातं 3 दशकाचं …मैत्रीचं ….रक्ताचं अन नवचैतन्याचं; ३१व्या ‘रक्तदान यागा’चं