जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते.
औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले होते. जखमीपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येथे नेहण्यात आले आहे. रेल्वे रूग्णालयात जखमींवर उपाचार सुरू आहेत. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
लॉकडाउनमुळे सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. पण रेल्वेची मालवाहतूक काही प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले होते. पण प्रवासादरम्यान रात्र झाली म्हणून सर्वांनी रेल्वे रुळावरच झोपण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडी खाली चिरडून १४ जणांचा मृत्यू झाला.
करमाड पोलीस निरीक्षक खेतमालस अधिक तपास करीत असून या अपघातातून वाचलेल्या तीन कामगारांकडून मयताची ओळख पटवीत आहेत. सर्व मयत व्यक्तींचे मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेले आहेत. या दुर्घटनेत मरण पावलेले कामगार मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील रहिवासी होते हे मजूर चंदनझिरा, जालना भागातील एसआरजे या स्टील कंपनीत कामाला होते.