मुंबई: काँग्रेसने दोन जागांचा आग्रह कायम ठेवल्याने महाराष्ट्र विकास आघाडीत विधान परिषदेच्या जागावाटपाचा पेच गुरुवारी कायम राहिला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे. विरोधी पक्ष भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली असून शिवसेना नेतृत्व मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. राज्यात करोनाचे संकट असल्याने निवडणूक बिनविरोध करावी, असा मतप्रवाह आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या निवडणुकीतील उमेदवार असल्याने मतदान टळावे, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे नवव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चुरस आहे. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीपेक्षा कमी मतांची गरज आहे. मतदान गुप्त असल्याने भाजप चौथी जागा लढविण्यावर ठाम असून आम्हाला चार जागा सोडल्या तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपनेत्यांचे मत आहे.
रविवारपर्यंत तोडग्याची शक्यता
राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागा सुटल्या होत्या. त्यामुळे आता या निवडणुकीत दोन जागा मिळाव्यात, असा युक्तिवाद काँग्रेसकडून केला जात आहे. यासंदर्भात आघाडीच्या नेत्यांच्या बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी बोलून मार्ग काढणार असल्याने शनिवार, रविवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार ८ मे आणि ११ मे असे दोन दिवस शिल्लक आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि डॉ. नीलम गोऱ्हे शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.