पुणे: शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, मृतांचाही आकडा वाढत आहे. यातच महापालिका आयुक्‍तांनी सोमवारी तर, विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्‍तांनी संयुक्‍तपणे मंगळवारी पत्रकार परिषद घेत कन्टेन्मेंट झोन वगळता इतरत्र सर्वत्र मॉल वगळता एकल दुकाने काही अटी व नियम पाळून उघडण्यास परवानगी दिल्याचे जाहीर केले.
मात्र, करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यापारी संघटनांनी लॉकडाऊन हटेपर्यंत दुकाने न उघडण्याचे जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शहरातील किराणा आणि वाईन शॉप्स वगळता कोणतीही दुकाने उघडली गेली नसल्याचे दिसून आले. एखादे दुसरे दुकान उघडले असले तरी ग्राहकांअभावी ते दुपारी बंद केले होते.
व्यावसायिकांची ओळखपत्रे पाहून सोडले गेले
शहरातील दुकाने उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर परवानगी दिलेल्या अस्थापनांच्या मालक व कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्र किंवा शॉप ऍक्‍ट परवाना पाहून सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, दुकाने उघडली गेली नसल्याने पोलिसांना दिवसभरात काही अडचणी आल्या नाहीत. दरम्यान, घरापासून दूर असलेल्या दुकानमालकांमध्ये जायचे कसे असा संभ्रम होता. यामुळे दुकाने न उघडणेच पसंत केले गेले. तसेच करोनाच्या भीतीने आणि ग्राहकही नसल्याने अनेकांनी दुकाने 17 मेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शॉप ऍक्‍ट विभाग, कामगार आयुक्‍त, विक्रीकर निरीक्षक गेले कोठे
वाईन शॉप्सचीही नियमावली जाहीर करून त्याचे पालन होते का नाही हे बघण्याची जबाबदारी पोलिसांकडेच देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप्स संदर्भात नियमावली जाहीर केली, त्याचे पालन कोणताही दुकानदार करताना दिसत नाही. नियम तोडल्यावर कारवाई करण्यास गेल्यास पोलिसांबरोबर वाद घातले जात आहेत. दुकानांसमोर शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. यामुळे करोना वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. अशा परिस्थित उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोठेच फिरताना किंवा कारवाई करताना दिसत नाहीत.
तर दुसरीकडे दुकाने उघडी ठेवण्याचे जाहीर केल्यावर त्यासंदर्भात पोलिसांना कोणतेही स्पष्ट निर्देश दिले गेले नाहीत. दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना पास द्यायचे की शॉप ऍक्‍ट परवाना बघून सोडायचे यात काहीच स्पष्टता नाही. दुकाने व अस्थापनांची जबाबदारी असलेला शॉप ऍक्‍ट विभाग, कामगार आयुक्‍त, विक्रीकर निरीक्षक यांची भूमिका कोठेही पहायवयास मिळत नाही.

अधिक वाचा  ऑल आयकॉनिक सीनियर सिटिझन्स असोसिएशन पुणे च्या दिल्ली NCR शाखेचा शुभारंभ