मुंबई : धारावीत करोनाच्या संसर्गाने शिरकाव केला असून करोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिकेसह सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्याचबरोबर काही सामाजिक संस्थाही यंत्रणांच्या खांद्याला खांदा भिडवून मदतीसाठी पुढे आल्या आहेत. काही संस्थांनी मोठय़ा प्रमाणावर पीपीई किट, मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा, तर काही संस्थांनी जेवण आणि धान्याचा पुरवठा केला आहे.
धारावीमध्ये करोनाविरुद्ध निकराची लढाई सुरू असताना पालिका आणि अन्य यंत्रणांच्या खांद्याला खांदा भिडवून सामाजिक संस्थाही उभ्या राहिल्या आहेत. निसर्ग फाऊंडेशन, उडान वेल्फेअर, अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन, न्यू एरा फॅब्रिक्स, अपस्टॉक्स/ आर.के.एस.व्ही सिक्युरिटीज, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅक्युप्रेशर, अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, प्रेम गांधी आदींनी धारावीकरांच्या मदतीला धाव घेतली आहे. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग, जुही चावला, प्रग्या कपूर (एक साथ द अर्थ फाऊंडेशन) यांनीही जेवण आणि धान्यपुरवठा करून धारावीकरांना मदतीचा हात दिला आहे.
या सर्वानी धारावीकरांच्या मदतीसाठी आतापर्यंत ४५ हजार ९०० मास्क, ७९० नाक-तोंड झाकण्यायोग्य मास्क, ३३०० एन-९५ मास्क, ६,३०० हातमोजे, १,४३० चेहरा झाकण्यासाठी प्लास्टिकचे आवरण (फेस शिल्ड), १८५८ लिटर सॅनिटायझर, १५९० सोडिअम हायपोक्लोराईट, ४,५६७ पीपीई कीट, ९०० कार्ड बोर्ड बेडस्, १७३ थर्मल स्कॅनर, ११९ पल्स ऑक्सिमीटर, ५० साबण इत्यादी वस्तूंचा पुरवठा केला आहे.
धारावीकरांना आतापर्यंत विविध धान्याचा समावेश असलेली २६,३०० पाकिटे देण्यात आली असून दररोज दोन हजार तयार जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात येत आहे.
दाटीवाटीने उभ्या असलेल्या धारावीमधील नागरिकांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून मुंबई महापालिका आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. आता सामाजिक संस्थांही मदतीचा हात पुढे करीत मोलाची मदत करीत आहेत.
-किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’