पुणे शहरातील जे भाग करोना विषाणूने संक्रमित आहेत, ते सोडून इतर भागातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना काढला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
या आदेशाबाबत आयुक्त गायकवाड म्हणाले, पुणे शहरात करोना विषाणूंच्या वाढत्या रुग्णांच्या संख्या लक्षात घेता. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व निर्णय घेतले जात आहेत. आजवर देशभरात ४० दिवसापांसून सर्व व्यवहार ठप्प असून अशीच परिस्थिती पुणे शहरात देखील आहे. अर्थ व्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलली जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून जे भाग करोना विषाणूंचा संक्रमित (प्रतिबंधीत क्षेत्र) आहेत. त्या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवेची आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. तर उर्वरित सर्व भागातील सर्व दुकानं सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
खबरदारीचा भाग म्हणून रस्ता, कॉलनी आणि गल्ली या भागात प्राथमिकता असलेली पाच दुकाने चालू ठेवता येणार आहे. तसेच प्रत्येक दुकानदारांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच १७ मे पर्यंत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तोवर हा आदेश लागू असेल, त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल असे, त्यांनी सांगितले.