पुणे : शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून त्याबाबतचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या चाचण्या, दाट लोकवस्ती, सार्वजनिक शौचालयांचा वापर, अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेले रुग्णही बाधित निघणे, करोना बाधित असूनही सुरुवातीच्या काळात लक्षणे दिसून न येणे अशी विविध कारणे समोर आली आहेत.
शहरात करोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे याबाबतचा अभ्यास केला आहे. त्यातून ही कारणे समोर आली आहेत. महापालिकेच्या पंधरापैकी केवळ पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता, येरवडा-कळस-धानोरी आणि कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात ७३ टक्के करोनाचे रुग्ण आहेत. प्रभागनिहाय विचार केल्यास ४६ पैकी आठ प्रभागांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचा अभ्यास केला असून त्यातून निष्पन्न झालेल्या कारणांवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील नागरिक दाट लोकवस्तीत राहण्यास असल्याने शारीरिक अंतराचा नियम पाळला नसल्याचे लक्षात आल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्याचा उपाय समोर आणला होता. मात्र, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या परिसरातच घशातील द्रव घेण्याची केंद्रे उघडण्यात आली आहेत.
करोनाची लक्षणे दिसत असल्यास संबंधितांना तेथेच विलग केले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
महापालिकेचे निरीक्षण
पालिकेच्या शासकीय रुग्णालयांमध्ये अन्य आजार किंवा अपघातात जखमी होऊन उपचारांसाठी दाखल झालेले रुग्ण देखील करोना बाधित असल्याचे आढळून येत आहे. लक्षणे नसलेले, मात्र करोना बाधित असलेल्यांची संख्या मोठी आहे. लक्षणे नसताना संबंधित नागरिकांच्या चाचण्या नकारात्मक येतात, मात्र काही दिवसांनी ते करोनाची लक्षणे दाखवतात. नमुने घेतल्यानंतर संबंधित नागरिक त्यांच्या घरीच राहतात आणि ते बाधित निघाल्यास त्यांच्या घरच्यांबरोबरच परिसरातील त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबरोबरच दाट वस्ती किंवा झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळेही करोना बाधितांची संख्या वाढत आहे, असे निरीक्षण महापालिका आयुक्त गायकवाड यांनी नोंदवले.