नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोना प्रसार वाढला आहे. आज कोरोनग्रस्तांचा आकडा 50 हजारहून अधिक गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांच्या संख्या 52 हजार 952 आहे. तर, आतापर्यंत 1783 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 902 आहे आणि आतापर्यंत 15 हजार 266 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र 15 एप्रिलपासून कोरोनोचा ग्राफ धक्कादायक पद्धतीनं वाढत आहे.
देशात 15 एप्रिल ते 22 एप्रिल या 8 दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारहून 20 हजारांवर गेली. तर, 23 एप्रिल ते 29 एप्रिल या 7 दिवसांत हा आकडा 30 हजारांच्यावर गेला. यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढताना दिसला. 30 एप्रिल ते 3 मे या 4 दिवसांत भारतानं 40 हजारांचा आकडा पार केला. तर, धक्कादायक म्हणजे गेल्या 3 दिवसांतच कोरोनाचा आकडा आता 50 हजारांवर गेला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोरोनाबाधितांची आकडेवारी काही कमी होत नाही आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये भारत आता 15व्या स्थानी आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यामुळं जगातली खराब परिस्थिती असलेल्या देशांमध्ये भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या 6 दिवसांचा देशाचा ग्राफ पाहिल्यास 1 मे ते 6 मे दरम्यान भारतात 704 लोकांचा मृत्यू झाला.
लॉकडाऊनमध्ये वाढला आकडा
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आल्याचं केंद्राकडून सांगण्यात येत आहे. मात्र आकडेवारी वेगळंच चित्र समोर मांडत आहे. देशात 24 मार्च पर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 571 होती. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात सर्वाधिक 49 हजार 429 रुग्ण आढळले. देशातील 11 राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या 1 हजारांहून अधिक आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात 15 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. त्याखालोखाल गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात आकडा वाढता
देशात सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार 541 आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारांहून जास्त आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत सर्वात जास्त आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वात जास्त 1233 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील एकट्या मुंबईत 796 प्रकरणे आहेत. तर मुंबईत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 90 हजार 879 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील 1 लाख 73 हजार 838 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

अधिक वाचा  या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?