मुंबई: मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) तक्रार केली आहे. आमदार नितेश राणे यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी हा व्हीडिओ खोटा असल्याचे म्हटले होते. मात्र, गुरुवारी सोमय्या यांनी आपण या व्हीडिओची खातरजमा केल्याचे सांगितले. हा व्हीडिओ सायन रुग्णालयातीलच आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनीही याची कबुली दिली आहे. मृत रुग्णांचे नातेवाईक बॉडी क्लेम करायला लवकर येत नाहीत. तर दुसरीकडे नव्याने येणाऱ्या रुग्णांनाही दाखल करून घ्यावे लागते. त्यामुळे नाईलाजाने मृतदेह वॉर्डातच ठेवावे लागत असल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांनी दिली.
याशिवाय, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी पुरेशा बॅग्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवावे लागत आहेत. त्यामुळे आता सरकार यासंदर्भात काय कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा व्हीडिओ प्रसारित झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाची बाजू मांडली आहे. नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासंबंधी दिरंगाई केली जाते. नातेवाईक जर येत असतील तर मृतदेह तिथेच प्लास्टिक रॅप करुन देण्याचा विचार प्रशासनाने केला असावा, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

अधिक वाचा  गौतम गंभीर येताच तीन नव्या वादाला तोंड फुटले; चर्चांना उधाण, नेमकं काय घडतंय?