टाळेबंदी लागू केल्याने अडकलेल्या परराज्यांतील मजूर, कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी लवकरच मुंबई आणि पुण्यातूनही रेल्वे सोडण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय होईल. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातून आतापर्यंत मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात आदी राज्यात २५ रेल्वेद्वारे हजारो कामगारांना पाठविण्यात आल्याची माहिती अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी दिली.
पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांचा अपवाद वगळता सर्वच राज्यांनी नागरिकांना स्वीकारण्यास परवानगी दिली असून त्यानुसार विविध ठिकाणांहून त्यांना पाठविण्यात येत आहे. विविध राज्यात अडकलेल्या नागरिकांना घेऊन दोन रेल्वे चंद्रपूर आणि गडचिरोली येथे आल्या असून, दिल्ली येथील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासंदर्भात रेल्वेशी बोलणी झाली असून लवकरच त्यांना भुसावळ येथे आणले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मंत्र्यांची नाराजी
करोना रोखण्यासाठी उपाययोजना करताना किंवा त्यासंदर्भातील आदेश काढताना प्रशासन विश्वासात घेत नसल्याबद्दल अनेक मंत्र्यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त के ल्याचे कळते. मुख्य सचिवांचे आदेश परस्पर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना जातात. स्थानिक अधिकारी पालकमंत्री किं वा त्या भागातील मंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर आदेश काढतात. हे आदेशही सातत्याने बदलत असतात. त्यामुळे काय चाललेय हे लोकांना आणि लोकप्रतिनिधींनाही कळत नाही अशा तक्रारींचा सूर अनेक सदस्यांनी लावल्याचे समजते.