‘संघटित प्रयत्नांनी आपण मानवतेला कठिण परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. लोकांच्या समस्या कमी करु शकतो’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणाले. ते बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इंटरनॅशनल बुद्धिस्ट फाऊंडेशनकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भगवान बुद्धांनी भारताची संस्कृती आणि परंपरेला समृद्ध केले. त्यांनी आपल्या जीवनयात्रेत दुसऱ्याचे जीवन प्रकाशित केले’ असे मोदी यांनी सांगितले.
“आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत, जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी काम करत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी, गरीबांना भोजन देण्यासाठी, रुग्णालयात स्वच्छतेसाठी, रस्त्यावर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास काम करत आहेत. भारतात आणि देशाबाहेर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात अशी व्यक्ती अभिनंदनास पात्र आहे, त्यांना मी नमन करतो” असे मोदी म्हणाले. मोदींनी आपल्या भाषणातून कोविड वॉरिअर्सचा सन्मान केला. “जगात सध्या सर्वजण चिंतेमध्ये आहेत. काही वेळा दु:ख, निराशा, हताशेचा भाव दिसते. त्यावेळी भगवान बुद्धांची शिकवण अधिक प्रासंगिक ठरते” असे मोदी म्हणाले.
“आज आपण कठिण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सतत प्रयत्न करतोय. एकत्र काम करत आहोत. भारत निस्वार्थी भावनेने देशात आणि संपूर्ण जगात संकटात सापडलेल्या लोकांच्यामागे भक्कमपणे उभा आहे. संकटाच्या काळात सहाय्य करण्याची गरज आहे. शक्य तितकी मदत करा” असे आवाहन मोदींनी केले. “संकट काळात जगातील अनेक देशांना भारताची आठवण झाली. आज आपले प्रत्येक भारतीयाचे जीवन वाचवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत पण त्याचबरोबर जागतिक जबाबदारीचेही पालन करतोय. भारताची प्रगती जगाच्या प्रगतीला सहाय्यक ठरेल” असे मोदी म्हणाले.

अधिक वाचा  राज्यात आगामी काळात धक्कादायक घडामोडी? मोदींचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री शिंदे अन् आठवलेंना कॅबिनेटपद नाही