मुंबई : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत उत्सुकता ताणली जात आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार हे अजून निश्चित व्हायचं आहे. मात्र महाविकास आघाडी आणि भाजपचं संख्याबळ पाहता ही निवडणूक प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक रिंगणात असल्याने २१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची भूमिका आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने ५ जागा घ्याव्यात आणि भाजपला ४ जागा द्याव्यात अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीकडे येणाऱ्या ५ जागांपैकी २ जागा शिवसेनेला, २ जागा राष्ट्रवादीला आणि १ जागा काँग्रेसला असं वाटप असेल. मात्र काँग्रेसला हे मान्य नाही. काँग्रेसला २ जागा हव्या आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या ६ जागा निवडून येऊ शकतात, मग भाजपला एक जादा जागा का द्यायची? अशी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी भूमिका मांडली आहे.
या निवडणुकीत विधानसभेतील २८८ आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर एक उमेदवार निवडून येण्यासाठी २९ मतांचा कोटा आहे.
महाविकास आघाडीच्या बाजुने किती संख्याबळ?
शिवसेना – ५६, राष्ट्रवादी – ५४, काँग्रेस – ४४, या तीन पक्षांचे मिळून १५४ संख्याबळ आहे. याशिवाय प्रहार – २, स्वाभिमानी – १, शेकाप – १, बहुजन विकास आघाडी – ३, सपा – २, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – ७ असं १७ जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच १५४ + १७ असं १७१ मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे. महाविकास आघाडीने ६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर २९ मतांच्या कोट्यानुसार त्यांना १७४ मतांची गरज आहे. म्हणजेच सहावी जागा निवडून आणायला महाविकास आघाडीला तीन मतं कमी पडतात. जे लहान पक्ष तटस्थ आहेत त्यांची मतं मिळवून सहावी जागा जिंकता येईल, असा काँग्रेसचा दावा आहे.
भाजपकडे किती संख्याबळ?
आता भाजपाने ४ जागा लढवायचं ठरवलं तर काय होईल ते आपण पाहूयाात
भाजपकडे स्वतःची १०५ मतं आहे तर ८ अपक्ष भाजपबरोबर आहेत. अशी भाजपकडे ११३ मतं आहेत.