“मी शिवसेना सोडेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. आजदेखील कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे व्यक्त केलं. लोकसत्ता आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवादात नारायण राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
“नारायण राणेंना घडवण्याचं श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं आहे. मी शिवसेनेत असताना माझं कर्तव्य पूर्ण केलं. आजदेखील कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही. कोणीही जर टीका केली तर त्या टीकेला मी नक्कीच उत्तर देतो. पण कोणाविषयीही मनात कटुता नाही,” असं राणे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपला राजकीय प्रवासही उलगडला. तसंच शिवसेना सोडण्यामागील कारणही सांगितलं.
यशाचं श्रेय बाळासाहेबांनाच
“मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. मी त्याचं एक टक्काही ते श्रेय घेणार नाही. जे काही शिवसेनेसाठी केलं ते मी कर्तव्य म्हणूनच केलं. ठाकरे या आडनावावर माझी अपार श्रद्धा आहे. त्यामुळे ठाकरे आडनावाचे आत्ता जे कुणीही आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात छोटासाही आकस नाही,” असं राणे यांनी स्पष्ट केलं.
नावानं ओळखणाऱ्यांपैकी एक
“शिवसेनेच्या जन्मापासून मी शिवसेनेसोबत होतो. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसैनिकांना नावाने ओळखत त्यापैकी मी एक होतो. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्टचा अध्यक्ष या वेगवेगळ्या पदांवर उत्कर्ष होत गेल्याने मी बाळासाहेबांच्या जवळ गेलो. त्यावेळी बाळासाहेब मला अनेक कामं सांगत होते. निवडणुका आल्या की गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पाठवलं तरीही मी गेलो. गडचिरोलीसारख्या ठिकाणीही मी शिवसेनेच्या दोन जागा निवडून आणल्या. त्यानंतर बाळासाहेबांचा माझ्यावर विश्वास बसला. त्यांचं प्रेम मला मिळालं. मी बाळासाहेब ठाकरेंसाठी वेडा होतो” असंही राणे यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या ‘या’ अति महत्वकांक्षी मागणीमुळे पवार अन् ठाकरेही झाले नाराज?