युनायटेड स्टेट्स : कोरोनामुळे जगभरातील अनेक व्यवसायांना फटका बसला आहे. हॉटेल व्यवसायाचे झालेले नुकसान तर अगणित आहे. दरम्यान हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत कंपनी Airbnb Inc ने त्यांच्या 25 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे. म्हणजे जवळपास 1900 कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. Airbnb Inc ही कंपनी होम रेंटल स्टार्टअप्समधील एक प्रसिद्ध कंपनी आहे. कोव्हिड-19 मुळे त्यांच्यावर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची वेळ आली आहे. या कंपनीचे संस्थापक ब्रायन चेस्की यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस पाठून यासंदर्भात माहिती दिली आहे. वृत्तसंस्था Reuters ने यासंदर्भात माहिती दिली. Brian Chesky यांनी त्यांच्या ट्विटरवर देखील यासंदर्भात ट्वीट केले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेला मेमो देखील शेअर केला आहे.
हा मेमो शेअर करताना त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘आमच्या कंपनीतून खूप चांगली माणसं सोडून जात आहेत, आणि माझ्या मते इतर कंपन्या देखील त्यांना माझ्याइतकंच प्रेम देतील.’
‘Airbnb Inc सध्या खूप कठीण प्रसंगातून जात आहे. या वर्षी जेवढी कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ती 2019 च्या कमाईच्या निम्मी देखील नाही आहे.’ असं ब्रायन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 7,500 इतकी होती. आता साधारण 1900 जणांना काढून टाकण्यात येणार आहे. अमेरिका आणि कॅनडामधून काढण्यात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा 11 मे हा शेवटचा दिवस असेल. ज्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना कंपनीकडून 14 आठवड्यांचा बेसिक पे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जितकी वर्ष या कर्मचाऱ्यांनी कंपनीत काम केलं आहे त्या वर्षासाठी प्रत्येकी एक आठवडा असा अतिरिक्त पगारही देण्यात येईल. म्हणजे जर कंपनीत तो कर्मचारी 5 वर्ष काम करत असेल तर त्याला 5 आठवड्यांचा अतिरिक्त पगार मिळेल.

अधिक वाचा  लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेची मुंबईतील 36 पैकी 25 जागांची ठाकरेंची तयारी;