जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची देशातील एकूण संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 33 हजार 514 रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले 14 हजार 182 जण व एक स्थलांतरित तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 694 जणांचा समावेश आहे.
करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने समूह संसर्ग सुरू झाला आहे का? या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढले पाहिजे. प्रतिबंधित भाग आणि अन्य ठिकाणीही श्वसनाच्या गंभीर आजाराची लक्षणे व्यक्तींमध्ये दिसत आहेत का, यावर देखरेख ठेवली पाहिजे, असे अगरवाल यांनी सांगितले.
स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्याची केंद्राने परवानगी दिल्यानंतर चार दिवसांमध्ये विविध राज्यांतून ६२ विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या. त्यातून ७२ हजार मजुरांनी प्रवास केला. आणखी किमान १३ रेल्वेगाडय़ा सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. राज्यांकडून होणाऱ्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  ‘ओबीसीं’कडून ‘सगेसोयरे’वर एका जिल्ह्यातच तब्बल 60 हजार हरकती…; हरकतींचे वर्गीकरणही सुरू