देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, बीसीसीआयने सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द केल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या महाराष्ट्रातील अलिबाग या पर्यटन स्थळी अडकले आहेत. Sony Ten वाहिनीच्या एका कार्यक्रमात पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी गप्पा मारताना रवी शास्त्री यांनी आपला क्वारंटाइनमधला दिवसांबद्दल सांगितलं.
“मी सध्या अलिबागमध्ये आहे, आणि काही दिवसांपूर्वीच आम्ही रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये आलो आहोत. त्यामुळे आता मी बिअर घ्यायला जाणार आहे, मला खात्री आहे की काही दुकानं नक्कीच उघडी असतील. माझ्यासोबत आणखी दोघांना सोबत घ्यायचं असेल तर रॉजर बिन्नी आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन या दोघांना सोबत घेईन.” दारुच्या दुकानाबाहेर सध्या खूप रांगा असल्याचं मी पाहतोय, पण सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम मी पाळणार असल्याचंही शास्त्री यांनी स्पष्ट केलं.
२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर रवी शास्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांना बीसीसीआयने दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. २०२१ साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहणार आहेत. याआधी रवी शास्त्री सोशल मीडियावर आपल्या बिअर पिण्याच्या सवयीवरुन बऱ्याचदा ट्रोल झाले आहेत.

अधिक वाचा  बुलडाण्यामध्ये खळबळजनक घटना; अधिकाऱ्यासमोरच महिलेचे थेट हातावर ब्लेडने सपासप वार असं काय घडलं?