टाळेबंदी टप्प्या-टप्प्याने शिथिल होईलही; पण जूनपासूनच मुलांनी शाळांमध्ये मोठय़ा संख्येने एकत्र येणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शाळांबाबत शिथिलतेचा वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. परिणामी मुलांना आणखी काही दिवस घरी राहावे लागले, तर काय काय करता येईल? मुलांना, पालकांना अन् शाळांनासुद्धा?
गेली काही वर्षे २०२० हे वर्ष कुतुहलाचे वाटत होते. भारत महासत्ता होण्याचे वर्ष म्हणून याकडे डोळे लागले होते. हे वर्ष वैशिष्टय़पूर्ण ठरले, पण वेगळ्या कारणासाठी. करोनासाठी. हे वर्षच काय, पण या शतकाची ओळख बनून राहील असे हे करोनापर्व आहे. या अकल्पितपणे आलेल्या विषाणूने आपल्या सर्वावर विलगीकरण लादलेले आहे. मुलांना घरात गुंतवून ठेवण्याचे मोठे आव्हान विलगीकरणाच्या या काळात पालकांसमोर आहे. दोन गोष्टींचा विचार यासाठी प्रामुख्याने करता येईल.
एक म्हणजे, विलगीकरणाचा काळ संपून जेव्हा व्यवहार सुरू होतील तेव्हा ते नक्कीच पूर्वीप्रमाणे अगदी सुरळीत सुरू होणार नाहीत. आधीसारखे व्यवहार सुरू व्हायला काही काळ जावा लागेल. त्यामुळे नजिकच्या भविष्याच्या गरजा वेगळ्या असतील. त्याची तयारी करणे.
आणि दुसरे, आत्ताचा काळ अधिक अर्थपूर्णतेने व्यतीत करणे.
आपल्याकडच्या शाळांचा विचार केला तर, शे-दोनशे विद्यार्थीसंख्येपासून तीन-साडेतीन हजार किंवा अधिकही विद्यार्थीसंख्येच्या शाळा आहेत. मुलांनी इतक्या मोठय़ा संख्येने जून महिन्यातच एकत्र येणेही धोकादायक ठरू शकते. शाळांबाबत शिथिलतेचा वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुलांना आणखी काही दिवस घरी राहावे लागले, तर काय काय करता येईल?
सह-अध्ययन
काही शाळा आणि संस्था यांनी आत्तापासूनच ऑनलाइन अभ्यास सुरू केला आहे. शहरी भागात ज्या पालकांकडे स्मार्टफोन आहेत, तिथे हे शक्य झाले आहे. पण एका सर्वेक्षणानुसार, आजही ग्रामीण भागात ४० ते ६० टक्के मुलांकडे ही सुविधा नाही. त्यामुळे सर्वाच्या ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत.
जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हाही सगळ्या मुलांचे पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू होतीलच असे नाही. कदाचित ठरावीक दिवस ठरावीक संख्येने मुले शाळेत येणे असे काही ठरू शकते. त्यातही ज्यांच्यापर्यंत ऑनलाइनची सुविधा पोहोचली नाही, त्यांचा वेगळा विचार करावा लागेल. जे ऑनलाइन शिकू शकले आहेत, त्यांनी अन्य मुलांना शिकवणे किंवा आपल्यापेक्षा लहान मुलांना शिकवणे अशा जबाबदाऱ्या आपणहून घेतल्या तर चांगले होईल. त्यामुळे मोठय़ा संख्येने मुलांचे एकत्र येणे टाळता येणे शक्य आहे. आपण शिकून इतरांनाही शिकवायचे आहे याचे भान ऑनलाइन शिकताना आत्तापासूनच असेल, तर आत्ताचे शिकणे जास्त काळजीपूर्वक होईल.
संकल्पनाधारित अध्ययन
शिकण्याच्या आशयाबाबतही काही धोरण ठरवावे लागेल. २८ एप्रिल २०२०च्या ‘लोकसत्ता’तील वृत्तानुसार, पुढील इयत्तांसाठी अत्यावश्यक आशय ठरवून तो शिकवला जाईल, असे दिसते आहे. सर्वच इयत्तांच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण केले, तर काही संकल्पना मध्यवर्ती असल्याचे दिसून येते. त्यामुळे विषयांचे धडे शिकवण्यापेक्षा या संकल्पना आत्मसात होण्यावर भर द्यावा लागेल. यासाठी कृतींचे आयोजन करून घरी करायच्या कृती आणि शाळेत करून घेण्याच्या कृती अशी विभागणी करता येईल. गणित, विज्ञान आणि भूगोल या विषयांसाठी हे अत्यावश्यक आहे. या प्रकारात कदाचित भाषा मागे पडण्याची शक्यता आहे. ती उणीव प्रकल्पांतून काही प्रमाणात तरी भरून काढणे शक्य होईल.
प्रकल्पाधारित अध्ययन
करोना काळात जगातील वेगवेगळ्या देशांची या साथीच्या अंगाने माहिती मिळते आहे. याचा उपयोग इतिहास, भूगोल शिकताना होऊ शकतो. उदाहरणार्थ, मोठय़ा वर्गासाठी विविध देशांतील साथीचा प्रसार, तिथले हवामान, देशांतील आर्थिक संबंध, पर्यटन यांचा अभ्यास आणि परस्परसंबंध असे विषय. तर लहान वर्गासाठी या काळात झालेला आहार व आरोग्याचा विचार आणि कृती यांवर प्रकल्प. यातल्या प्रत्येक प्रकल्पाबरोबर भाषा जोडली जाऊ शकते. शिवाय भाषेचे वेगळे प्रकल्प असू शकतात. उदाहरणार्थ, म्हणींचा प्रकल्प. मुले कुटुंबातल्या, शेजारच्या व्यक्तींना भेटून, बोलून याविषयी माहिती मिळवू शकतील. तसेच शाळा सुरू झाली तरी मुलांना एकेकटय़ाला किंवा दोघा-दोघांना काम देता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ, इंदिरा संतांच्या कविता. कवयित्रीची माहिती मिळवणे, कविता कोणत्या काळात केली तो काळ कवितेत कुठे, कसा दिसतो यावर विचार करणे. अशा कृती देऊन भाषेचे काही प्रमाणात शिकणे घडू शकते.
या काळात एक मात्र नक्की समजेल की, विषयाचा काही भाग मुले शाळेत न येताही घरी राहून शिकू शकतात. त्यामुळे अशा भागाची जबाबदारी मुले पालकांच्या मदतीने घेऊ शकतात. असे घडू शकले तर शाळेच्या वेळा आणि कालावधी या दोन्हींचा पुनर्विचार होऊ शकतो. ज्यामुळे भविष्यकाळात ये-जा करण्यासाठी इंधन, ऊर्जा आणि वेळ यांची बचत होऊ शकते.
आजवर मुलांच्या शिकण्याची जबाबदारी केवळ शाळा आणि शिक्षक यांचीच मानली जायची. आता यातला पालकांचा वाटा त्यांनी उचलण्याची वेळ आली आहे.
पालकांच्या सहभागाने होणारे अध्ययन
पालकांचा शिक्षणातला सहभाग नुसते शाळेतले विषय शिकवण्यापुरता नक्कीच अपेक्षित नाही. वर सांगितलेल्या अध्ययनात पालकांची मदत आवश्यक ठरेलच; पण तेवढे पुरे नाही. येणाऱ्या काळाच्या गरजा ओळखून त्यासाठी मुलांना तयार करणे हे काम आता पालकांना करावे लागेल.
अगदी नजिकच्या भविष्याचा विचार केला तरी, गरजेपुरते अन्न शिजवून ते सर्वानी वाटून खाण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत कदाचित प्रत्येकाच्या आवडीनुसार पदार्थ तयार करणे, आवडले नाहीत तर टाकून देणे, डब्यातले अन्न परत आणून वाया घालवणे या सवयी असतील, तर त्या बदलाव्या लागणार आहेत. गरजेपुरता अन्नसाठा नक्कीच उपलब्ध असेल, पण चोचले पुरवण्याइतका मिळायला कदाचित थोडा काळ जावा लागेल. यातून सर्वच गोष्टींबाबत गरजेइतका वापर करण्याची सवय या काळात लावून घ्यावी लागेल.
दुसरे म्हणजे, आपण रोजच्या कामांसाठी इतर अनेक व्यक्ती किंवा सेवा देणाऱ्या यंत्रणांवर अवलंबून असतो. जसे की, घरी भांडी घासायला येणाऱ्या बाई. आत्ता तर ही कामे घरी करावीच लागत आहेत; ती अजून काही काळ करावी लागतील अशी चिन्हे आहेत. अशा वेळी ही कामे घरातल्या सर्वानी मिळून करणे गरजेचे झाले आहे. लहान मुलेही वडील किंवा घरातले अन्य पुरुष कामे करताना पाहतील. त्यातूनही त्यांचे शिकणे घडेल. तसेच त्यांच्यावरही छोटय़ा-छोटय़ा जबाबदाऱ्या टाकल्या, तर ती आनंदाने पार पाडतील. अर्थात, त्या वेळी होणाऱ्या काही चुका समजून घ्यायला हव्यात. त्यांना श्रमाची विभागणी समजेल. श्रमाविषयी, ते करणाऱ्या व्यक्तींविषयी आदर निर्माण होईल.
या सवयी करोना-काळापुरत्या नाही, तर आयुष्यभरासाठी उपयोगी पडतील अशा आहेत. कायमस्वरूपी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी करोनाच्या निमित्ताने पालकांनी आवर्जून लक्षात आणून द्यायला हव्यात. मित्र भेटणे, मित्रांशी खेळणे ही आत्ता आयुष्यातली श्रीमंती ठरली आहे. येणाऱ्या काळात एकूणच नात्याचे मोल पूर्वीपेक्षा अधिक जाणवायला लागेल. पण हे केवळ करोना-काळापुरते न राहता कायमस्वरूपी कसे टिकेल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. निसर्गात होणारे बदल मुलांच्या लक्षात आणून द्यायला हवेत. कधी नव्हते एवढे पक्ष्यांचे आवाज आताशा ऐकू येत आहेत. शुद्ध हवेचा खोल श्वास घेता येतो आहे. ही श्रीमंती मुलांच्या लक्षात आणून द्यायला हवी आणि ती टिकवण्याची जबाबदारी आता या पिढीची आहे, हेही त्यांच्या मनावर बिंबवायला हवे.
मुलांच्या सवयी आणि वृत्ती यांचा हा वाटा आता पालकांनी उचलायचा आहे. ज्या घरांत, पालकांनी ही जबाबदारी पूर्वीच उचलली आहे, तिथे पालकांना या विलगीकरणाच्या काळातही मुलांबाबत आव्हाने कमी आहेत असे दिसून येते आहे. कारण अशा सवयींमुळे मुले जबाबदारी घेत आहेत, स्वत:च स्व:तला रमवायला शिकली आहेत.
आणखी एक धडा करोना नावाच्या नगण्य विषाणूने मानवजातीला शिकवला आहे. तो आहे अनिश्चिततेचा! अनिश्चित, अनपेक्षित भविष्यकाळाला सामोरे जाण्यासाठी यातून योग्य तो बोध आपण घेतला तर हा काळ सत्कारणी लागेल.
लेखिका शिक्षणशास्त्रात पीएच.डी. असून ‘ग्राममंगल’ या संस्थेत कार्यरत आहेत.

अधिक वाचा  “पर्वती विधानसभा एकाच नावाचे तीन उमेदवार; मतदारांमध्ये गोंधळ वाढण्याची शक्यता!”